नागपूर- शनिवार आणि रविवारी नागपुरात जनता कर्फ्यु लावण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनसंदर्भात गेल्या काही दिवस सुरू असलेल्या आणि यामुळे जनतेमध्ये पसरलेले संभ्रमाचे वातावरण दूर करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी आज (शुक्रवार) लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शहरातील खासदार, आमदार, मनपातील पदाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त उपस्थित होते.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर नागपुरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यू... - नागपूर बातमी
जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व दुकानं बंद ठेवावी, लोकांनी अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात लॉकडाऊन संदर्भात उलट सुलट चर्चा सुरू होती. मनपा आयुक्तांनी लॉकडाऊन नव्हे तर कर्फ्यु लावला जाईल आणि तो ही १५ दिवस राहील, असे वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन न करता शिस्तीचे पालन करून काही कठोर उपाययोजना करता येईल का, यासंदर्भात सर्वांचे एकमत झाल्याने शनिवारी आणि रविवारी नागपूर शहरात कडक जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत लाॅकडाऊन केलं पाहिजे यासाठी कुणीही आग्रह केला नाही. पण नियम पाळले जावेत यासाठी एकत्रीत प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला आहे.
नागपुरात लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून लोकांना आवाहन करणार आहेत. अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व दुकानं उद्या परवा बंद राहणार आहेत. ३१ तारखेला पुन्हा बैठक होणार आहे. त्यात जनतेने नियम पाळले नाही तर बैठकीत लाॅकडाऊनबाबत निर्णय होणार आहे.