नागपूर : House fire in Nagpur : शहरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सेमिनरी हिल परिसरात एका घराला रात्री दहा वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू झाला. सेमिनरी हिल भागात व्हेटर्नरी कॉलेजमागे गोविंद गोरखेडे कॉम्प्लेक्स आहे. त्या शेजारी नांदे कुटुंबाचं घर आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक झोपडीला आग लागली. या आगीत दोन लहान मुलांचा भाजल्यानं मृत्यू झाला. देवांश आणि प्रभास उईके अशी मृतक मुलांची नावं आहेत. तर एक मुलगी थोडक्यात वाचली. आगीत घरातील कुत्र्याचाही मृत्यू झाला.
घरात दोन सिलेंडर होते : थंडी असल्यानं मुलांनी घरातचं शेकोटी पेटवली होती. त्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातं आहे. ज्यावेळी आग लागली त्या वेळी घरात देवांश, प्रभास आणि त्याची मोठी बहीण होती. तर, मुलांचे वडील हे कामाला गेलेले होते. मुलांची आई ही शेजाऱ्यांकडे कामानिमित्त गेली होती. आग लागल्यानंतर देवांश आणि प्रभास हे दोघे घरात अडकून पडले होते. या चिमुरड्यांना या आगीतून बाहेरदेखील पडता आले नाही. त्यांची मोठी बहीण गोंधळून गेली. ती जीव वाचवून घराबाहेर पडली. तिनं आरडाओरडा सुरू केल्यानंतर स्थानिक लोक मदतीसाठी पुढे आले. मात्र, तोपर्यंत दोघांचा आगीत भाजल्यानं मृत्यू झाला होता. ज्यावेळी घराला आग लागली त्यावेळी घरात दोन सिलेंडर होते. सुदैवानं त्यांच्यापर्यंत आग पोहोचण्यापूर्वी अग्निशमन विभागाच्या पथकाने आग विझवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, नागपुरात थंडी वाढत असताना आगीच्या घटना वाढत आहेत. अशा स्थितीत नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.