नागपूर - शहरातील पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या चंदनच्या झाडाच्या चोरी प्रकरणी नागपूर शहरातील सदर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलीस उपायुक्तांच्या बंगल्याला सुरक्षा व्यवस्था असताना देखील चोरट्यांनी केलेल्या धाडसामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित व्हायला लागले होते. अखेर १७ दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
सदर पोलीस ठाणे हद्दीत पोलीस परिमंडळ क्रमांक एकचे पोलीस उपायुक्त नूरउल हसन यांचा शासकीय बंगला आहे. ११ जुलैच्या रात्री त्यांच्या बंगल्याच्या आवारातील एका चंदनाच्या झाडाची कटाई करून अज्ञात चोरट्यांनी चंदनाचे लाकूड चोरून नेलं होते. पोलिस उपायुक्तांच्या बंगल्यातच चोरी झाल्याने चोरट्याला पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. याप्रकरणी धागेदोरे जोडत पोलीस काटोल तालुक्यातल्या गोंन्ही गावात जाऊन पोचले. तेथून पोलिसांनी रुपेश मुर्डिया नामक चोरट्याला अटक केली. त्याची चौकशी केली असता आपले दोन साथीदार राजेश गुजरवार आणि ओम प्रकाश गुजरवार यांच्यासह त्यानं हसन यांच्या बंगल्यात चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी राजेशला अटक केली असून ओमप्रकाश सध्या फरार आहे.