नागपूर- राज्य शासनाने दिलेल्या आदेशाच्या अधीन राहून शहरामध्ये १४ मे पासून ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी परवानगी दिली आहे. मात्र, त्याकरिता मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकाजवळ मद्यपरवाना असणे अनिवार्य करण्यात आला आहे. नागपुरात ऑनलाईन मद्यविक्री राज्य शासनाने ११ मे रोजी काढलेल्या आदेशानुसार सुरु होईल. प्रतिबंधित क्षेत्रातून किंवा क्षेत्रात मद्यविक्रीला किंवा मद्य ऑनलाईन पद्धतीने मागविण्यास परवानगी राहणार नाही, हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यासंदर्भातील नवे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. त्यानुसार काही दुकाने आळीपाळीने निरनिराळ्या दिवशी सुरू राहतील.
लॉकडाऊन: नागपूरमध्ये १४ मेपासून अंशत: शिथिलता; ऑनलाईन मद्यविक्रीसह अन्य सेवा सुरू - प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंध लागू
महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केलेल्या नवीन आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ७ ते ३ तर इतर ठिकाणी परवानगी दिलेल्या आस्थापना सकाळी ७ ते सांयकाळी ७ या वेळेत सुरु राहतील. प्रतिबंधित क्षेत्र सोडून ऑनलाईन मद्यविक्रीला देखील शासनाच्या नियमांचे पालन करत परवानगी देण्यात आलीय.
तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या नव्या आदेशानुसार नागरी क्षेत्रातील बांधकाम जेथे कामगार निवासी राहतील, तेथे बांधकाम सुरू करता येणार आहे. याशिवाय आयटी क्षेत्रासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन, इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल विक्री करणारी दुकाने सोमवार, बुधवार, शुक्रवारच्या दिवशी सुरु राहतील. ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी सुरु राहणार आहेत. ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉपसाठी मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवारचा दिवस ठरवण्यात आला आहे..
ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण), खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत तर सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत सुरू करता येणार आहे. या व्यतिरिक्त मान्सूनपूर्व सर्व कामे सुरू करण्यास देखील मनपा आयुक्तांनी परवानगी दिली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात हा आदेश लागू राहणार नाही. केवळ तेथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत सुरू असतील. प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे त्या आस्थापणा सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरु राहतील. जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, नागरी क्षेत्रातील उद्योग, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी दिलेली नाही.
हे राहणार सुरू
- केवळ परवानगी असणाऱ्या कामासाठी वैयक्तिक गाड्यांचा वापर
- एका कारमध्ये दोन व्यक्ती प्रवास करू शकतील.
- दुचाकी गाडीवर सहप्रवासी बसण्यास परवानगी नाही.
- आवश्यक सामुग्रीचे उत्पादन जसे औषधी, मेडिकल उपकरणे, त्यासाठी लागणारे साहित्य
- नियमित सुरू ठेवण्याची आवश्यकता असणारे प्रोडक्शन युनिट आणि वितरण व्यवस्था
- आयटी क्षेत्रासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन
- नागरी क्षेत्रात जेथे बांधकाम स्थळांवरच कामगार उपलब्ध असतील तेथील बांधकाम (प्रतिबंधित परिसर सोडून इतर परिसरातील नवनिर्मिती बांधकामांसाठी वेळोवेळी परवानगी दिली जाईल.)
- कोव्हिड-१९ च्या नियमानुसार जीवनावश्यक सामुग्रीची दुकाने आणि बाजारसंकुल
- प्रतिबंधित परिसरात फक्त जीवनावश्यक सामुग्रीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजता दरम्यान सुरू राहतील.
- इलेक्ट्रिकल सामुग्रीची दुकाने, कुलर, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार)
- ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार)
- ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार)
- ऑनलाईन मद्यविक्री
- ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण)
- खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत
- सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत)
- मान्सूनपूर्व सर्व कामे
- २० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करता येईल.
हे राहणार बंद
- सर्व देशांतर्गत आणि आंतरदेशीय विमानसेवा (मेडिकल सर्व्हिसेस आणि एअर अँबुलन्स वगळून)
- प्रवासी रेल्वे गाड्या (गृह मंत्रालय आणि राज्य शासनाने परवानगी दिलेल्या गाड्या वगळून)
- आंतरराज्यीय प्रवासी बस वाहतूक (शासनाची परवानगी असलेल्या वगळून)
- मेट्रो रेल्वे सेवा
- सर्व शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग (ऑनलाईन वर्गाना परवानगी राहील)
- सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम्नॅशियम, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जलतरण हौद आदी
- सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच गर्दी होणारे सर्व कार्यक्रम
- सर्व धार्मिक स्थळे
- सायकल रिक्षा आणि ऑटो रिक्षा
- टॅक्सी आणि कॅब सेवा
- जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील बससेवा
- सलून आणि स्पा
- सेझ, औद्योगिक वसाहती, निर्यात करणारे उद्योग