नागपूर : राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत वर्ष २०२५ पर्यंत ‘क्षयरोग मुक्त भारत’ करण्याचा निर्धार करण्यात आला असून या अनुषंगाने नागपूर शहरातील क्षयरुग्णांना पोषण किट देण्यासाठी रुग्णांचे पालकत्व स्वीकारण्याचे मनपाद्वारे आवाहन करण्यात आले होते. मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दात्यांनी पुढे येउन क्षयरुग्णांचे पालकत्व स्वीकारले. त्याचेच सकारात्मक परिणाम म्हणजे, मनपाच्या माध्यमातून विविध स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी नागरिकांद्वारे दत्तक घेण्यात आलेल्या क्षयरुग्णांचा चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आलेला आहे. दरम्यान याबाबतची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी माहिती दिली आहे.
पौष्टिक आहारासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन :नागपूर शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी मनपाकडे सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध आहे. केंद्र शासनाच्या एका अहवालानुसार बहुतांशी क्षयरुग्ण कुपोषणाच्या विळख्यात असून त्यांना किमान 6 महिने उत्तम पौष्टिक आहार मिळाल्यास ते क्षयरोग मुक्त होऊ शकतात. त्यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील सेवाभावी संस्था आणि नागरिकांना क्षयरुग्णांच्या पौष्टिक आहारासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारले पालकत्व : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 रुग्णांचे पालकत्व स्वीकारले आहे. याशिवाय सूद फाउंडेशन, प्रगल्भ फाउंडेशन, स्व. प्रभाकरराव दटके फाउंडेशन यासह पगारिया परिवारासारख्या अनेक दात्यांनी पुढाकार घेतला. एकट्या पगारिया परिवाराने तब्बल 250 रुग्णांचे पालकत्व स्वीकारले. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी देखील क्षयरुग्णांना पौष्टिक आहार देण्यासाठी 15 लाख रुपयांचा आमदार निधी जाहिर केला आहे. या सर्वांच्या सहकार्यानेच टी.बी. मुक्त भारताकडे ही वाटचाल यशस्वीरित्या सुरू राहील व पुढील उर्वरित 17 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत क्षयरोग मुक्त भारत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
सेवाभावी संस्था व नागरिकांचा सत्कार : क्षयरुग्णांच्या आरोग्यासाठी त्यांना पौष्टिक आहार किट देण्यासाठी पुढे आलेल्या सेवाभावी नागरिक व संस्थांच्या प्रतिनिधींचा मनपाकडून सत्कार करण्यात आला. यामध्ये सेवा फाउंडेशन, गरज फाउंडेशन, स्व. प्रभाकरराव दटके फाउंडेशन, सहयोग फाउंडेशन, सूद चॅरिटेबल फाउंडेशनसह अनेक सेवाभावी नागरिकांचा समावेश आहे.
हेही वाचा : Thane Crime : मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांच्या तत्कालीन अंगरक्षकाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिला भावनिक संदेश