नागपूर -जंगल सफारीची हौस असणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना काळ्या बिबट्याचे पुन्हा दर्शन झाले आहे. गेल्या महिन्यातच पेंचमध्ये काळ्या बिबट्याचे पहिल्यांदा दर्शन झाले होते. त्यावेळी बिबट अवघ्या काही सेकंदासाठी ओझरता दिसला होता. मात्र, यावेळेस पर्यटकांनी चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये बिबट स्पष्ट दिसत आहे.
विशेष म्हणजे, यावेळी त्याच्यासोबत अजून एक बिबट (सामान्य पिवळ्या काळ्या ठिपक्यांचा) दिसून आला. दोन दिवसापूर्वी पेंचच्या मध्यप्रदेशातील तुरिटा गेटजवळ पर्यटकांना या काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते. तुरिटा गेटमधून गेलेल्या काही पर्यटकांना हा काळा बिबट दिसला होता. अचानक काळा बिबट दिसल्याने सर्वच पर्यटक आश्चर्यचकित झाले होते.