नागपूर - धनत्रयोदशीच्या निमित्याने नागपुरातील सर्वच बाजारांमध्ये ग्राहकांची मोठी अनियंत्रित गर्दी उसळल्याचे चित्र आजही बघायला मिळाले. गेल्या आठ दिवसांपासून हीच परिस्थिती संपूर्ण नागपुरात बघायला मिळाली आहे. दिवाळीच्या निमित्याने खरेदी करण्याची परंपरा नागपूरकरांनी कायम राखली. मात्र, ही खरेदी करत असताना फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविण्यात मात्र नागपुरकरांनी आघाडी घेतली आहे.
लोकांचं बेजबाबदारपणे वागणं...
बाजारांमध्ये कोरोनाला आमंत्रण देणारी ग्राहकांची गर्दी होत असल्याने मनपा कर्मचाऱ्यांच्या मदतीला पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. मात्र, तरीही कुणालाही स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाची पर्वा नसल्याचे त्या कर्मचाऱ्यांना खेदाने नमूद करावे लागले आहे. दिवाळीकरिता बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र, अजूनही कोरोनाचे संकट कायम आहे याचा विसर मात्र नागरिकांना पडला आहे. नागपुरकरांनी दिवाळीच्या खरेदीसाठी कोणताही भान न ठेवता चक्क बाजारपेठेत झुंबड केलेली आहे. शहरातील बर्डी बाजारपेठेसह इतरही ठिकाणी नागपुरकर गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्द फक्त नाममात्र आहे कि काय? असेच चित्र बाजारपेठांमधे पाहायला मिळत आहे.