नागपूर -नागपूरसाठी 38 मेट्रीक टन ऑक्सिजन घेऊन दोन टँकर आज (दि. 24 एप्रिल) नागपूरात दाखल झाले आहेत. त्यातून शासकीय आणि खासगी रूग्णालये मिळून चार ठिकाणी 4 हजार 180 जम्बो सिलिंडर्स भरले जातील. त्यातून सुमारे 3 हजार पेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्सची गरज भागविली जाणार आहे.
तीन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी निकोचे उद्योग समूहाशी संपर्क साधला होता. त्यावेळी एक दिवसाआड ऑक्सीजनचा टँकर देण्याची कबुली त्यांनी दिली होती. त्यानुसार आज (दि. 24 एप्रिल) दोन टँकरच्या माध्यमातून 38 मॅट्रिक टन ऑक्सीजन नागपूरला मिळाले आहे. हे टँकर आज बुटीबोरी येथे दाखल झाले. ऑक्सीजन उपलब्ध करून दिल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निको उद्योग समूहाच्या संचालकांचे आभार मानले आहेत. कंपनीचे संचालक दोघेही मूळचे नागपूरकर असल्याने त्यांनी पुढाकार घेत एक दिवसाआड एक टँकर नागपूरला देण्याच्या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीला मान दिला होता. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी आणि त्यांचे बोलणे करून दिले होते. 21 एप्रिलला हा समन्वय घडवून दिल्यानंतर आज दोन टँकर्स नागपुरात पोहोचले. सिलतारा, रायपूर येथील जायसवाल निको प्रा. लि. या इंटिग्रेडेट प्रकल्पातून हा ऑक्सिजन नागपुरात आला. हा ऑक्सिजन नागपुरात आणण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था सुद्धा निकोनेच केली. यामुळे मोठा दिलासा नागपूरला मिळणार आहे.