नागपूर- गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये केटी-१ नावाच्या वाघाचा अचानक मृत्यू झाला आहे. या वाघाला गेल्या आठवड्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारा येथून बंदिस्त करून आणण्यात आले होते. या वाघाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पाच व्यक्तींचा बळी घेतल्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले होते. प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या निर्देशानुसार कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून या वाघाला क्वारंटाईन करण्यात आले होते.
नागपुरात वाघाचा मृत्यू; चंद्रपुरात पाच जणांचा घेतला होता बळी - KT-1 tiger
गेल्या आठवड्यात चंद्रपुरातून नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणलेल्या वाघाचा आज मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या वाघाला क्वारंटाईन करण्यात आले होते.
चंद्रपुरात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोलारा प्रवेशद्वाराजवळील गावांमध्ये या वाघाची दहशत होती. फेब्रुवारीपासून जून महिन्यापर्यंत या वाघाने जंगलात गेलेल्या ५ व्यक्तींना ठार केले होते. कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाची ओळख पटवल्यानंतर प्रधान मुख्य वन संरक्षकांनी या वाघाला पकडण्याचे आदेश दिले. त्यानंतर वन विभागाने १० जूनला वाघाला बेशुद्ध करून पकडले आणि ११ जूनला नागपूरच्या गोरेवाडा बचाव केंद्रात आणण्यात आले होते.
आज सकाळच्या सुमारास बचाव केंद्रातील कर्मचारी वाघाच्या पिंजऱ्याजवळ आल्यावर वाघाची कुठलीही हालचाल दिसली नाही. वरिष्ठांना याबद्दल माहिती दिल्यानंतर या वाघाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. शवविच्छेदन केल्यावर वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. सध्यातरी या वाघाचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.