नागपूर -शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवळ दुचाकीचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून तीन गावगुंडांनी एका महिलेशी वाद घातला. त्यानंतर त्यांनी चक्क त्या महिलांच्या अंगावर हात उगरल्यामुळे तिच्या भावाने गुंडांना सडेतोड उत्तर दिले. त्यावेळी दोन्ही गटात हाणामारी झाली. हा संपूर्ण प्रकार सेमीनरी हिल भागात घडला. दरम्यान वाहतूक पोलिसांनी ज्यावेळी या गुंडांना हटकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हे निर्लज्ज गुंड पोलिसांनादेखील जुमानत नसल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर पोलिसांनी यापैकी दोन गुंडांना अटक केली आहे. तर एका आरोपीचा शोध घेतला जात आहे. राजकिरण राजहंस आणि राकेश राऊत असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस निरीक्षकांची प्रतिक्रिया वाहतूक पोलिसांवरदेखील चढवला हल्ला -
एक शिक्षिका काल संध्याकाळी तिच्या कुटुंबियांसह सेमिनरी हिल परिसरातील बालोद्यानमध्ये फिरायला आली होती. घरी परत जाताना त्यांच्या दुचाकीने काही गुंडाच्या दुचाकीला कट लागला. गुंडांनी लगेच आपल्या बाईकने शिक्षिकेच्या दुचाकीचा पाठलाग सुरू केला आणि राजभवनाच्या मागील गेटजवळ त्यांना अडवत शिवीगाळ केली. प्रचंड नशेत असलेल्या एका गुंडाने थेट शिक्षिकेच्या अंगावर हात घालत तिला रस्त्यावर केस पकडून ओढले. त्यानंतर सोबत असलेल्या तिच्या भावाने विरोध करताच तिघे गुंड हाणामारीवर आले. शिक्षिकेने आरडाओरड करताच वाहतूक पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, गुंडांनी वाहतूक पोलिसांवरदेखील हल्ला चढवला. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला.
हेही वाचा - मोफत लसीकरणावरून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा युटर्न, म्हणाले...