नागपूर- मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. वर्चस्वाच्या वादातून तीन कैद्यांच्या एका गटाने प्रतिस्पर्धी कैद्याला जबर मारहाण केली. हल्ला झालेल्या कैद्याचे नाव रोशन कयूम शेख असे असून तो मकोको कायद्यानुसार कारागृहात गेल्या दहा महिन्यांपासून बंद आहे. या घटनेत जखमी झालेल्या रोशनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वर्चस्वाच्या वादात तीन कैद्यांनी केला दुसऱ्या कैद्यावर प्राणघातक हल्ला; जखमी कैद्यावर उपचार सुरू - नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये राडा
वर्चस्वाच्या वादातून तीन कैद्यांच्या एका गटाने प्रतिस्पर्धी कैद्याला जबर मारहाण केली. हल्ला झालेल्या कैद्याचे नाव रोशन कयूम शेख असे असून तो मकोको कायद्यानुसार कारागृहात गेल्या दहा महिन्यांपासून बंद आहे. या घटनेत जखमी झालेल्या रोशनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रोशन कारागृहात देखील गुंडगिरी करत असल्याने त्याचे अनेकांसोबत वैर निर्माण झाले होते. आज सकाळी रोशन अंघोळ करून येत असताना वाटेत उभ्या असलेल्या जतीन उर्फ जययोगेश जंगम,जे रान उर्फ बंटी जॉर्ज निकोलस आणि विशाल नारायण मोहरले यांना शिवीगाळ केल्याने संतप्त झालेल्या तिघांनी रोशन शेखवर हल्ला केला. रोशनची धुलाई केल्यानंतर आरोपींनी जेवणाच्या भांड्यापासून तयार केलेल्या धारधार शस्त्राने रोशनच्या शरीरावर वार केले. रोशनच्या ओरडण्याचा आवाज आल्याने कारागृहातील इतर कैदी आणि सुरक्षा रक्षक धावून आल्यानंतर मारामारी करत असलेल्या कैद्यांना दूर करण्यात आले. रोशन गंभीर जखमी असल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कारागृहात कैद्यांमध्ये मारामारी झाल्याची माहिती समजताच कारागृह अधीक्षक कुमरे कारागृहात दाखल झाले. जखमी कैद्याला मेडिकल येथे दाखल केल्यानंतर धंतोली पोलीस ठाण्यात तीन कैद्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.