नागपूर- रेमडेसिवीर इंजेक्शनची काळाबाजारी करणाऱ्या आणखी तीन आरोपींना नागपूर शहरातील सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक आरोपी हा खासगी हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयचे काम करतो. सीताबर्डी पोलिसांना तो इंजेक्शनची काळाबाजारी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी त्याचावर पाळत ठेवली होती. तो एका रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन विकणार असल्याची माहिती समजताच पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली आहे. शुभम पानतावणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी वॉर्ड बॉयचे नाव आहे, तर प्रणय येरपुढे आणि मनमोहन मदान अशी त्याच्या सहकाऱ्यांचे नाव आहेत.
गेल्या १५ दिवसांपासून नागपूर शहरात आणि जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार संदर्भात अनेक घटना उजेडात आल्या आहेत. ज्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेकांना संधीचा गैरफायदा घेऊन पैसे कमावण्याच्या उद्देशाने काम करत असलेल्या ठिकाणी चोरी करून केल्यानंतर ते इंजेक्शन चड्या भावाने विकत असल्याचे पुढे आले आहे. नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील एका नामवंत रुग्णालयातील वार्ड बॉयसह त्याचे दोन साथीदार एका तरुणीला रेमडेसिवीर इंजेक्शन 30 हजार रुपयांत विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक खोरवाडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांना लोकमत चौक परिसरात सापळा रचला होता. आरोपी हा इंजेक्शन घेऊन येताच पोलिसांनी त्याला रंगेहात अटक करून त्याच्या ताब्यातून दोन रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत.