नागपूर -रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नावाखाली इंजेक्शनच्या रिकाम्या झालेल्या बाटल्यांमध्ये पाणी भरून विकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. नागपूर शहरातील सक्करदार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तपासादरम्यान आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तीन वर पोहोचली आहे. महत्त्वाचे म्हणजे यातील दोन आरोपी हे एका साखगी रुग्णालयात एक्सरे टेक्निशियन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अभिलाष पेटकर(२८), अनिकेत नंदेश्वर (२१) आणि सुमित अशी याप्रकरणातील आरोपींची नावे आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारामध्ये सध्या रेमडेसिवीर इंजेक्शन महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून, अनेक जण याचा फायदा घेऊन रेमडेसिवीरचा काळा बाजरा करताना दिसत आहेत. काळ्याबाजारात हे इजेक्शन वाढीव किंमतीने विकले जात आहे. दरम्यान असेच एक प्रकरण नागपूरमधून समोर आले आहे. सक्करदार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिरची बाजार परिसरात दोन तरुण रेमेडिसीवर इंजेक्शन विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ रेमेडिसीवीरच्या दोन बाटल्या आढळून आल्या, ज्यामध्ये ते पाणी भरून विकण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.