नागपूर- येथे रस्त्यावरील चिखल स्वच्छ करण्याच्या मुद्द्यावरुन झालेल्या वादात धर्मकाटा कार्यालयात काम करणाऱ्या कॉम्पुटर ऑपरेटरने सुरक्षा रक्षकावर फावड्याने प्राणघातक हल्ला केला. यात सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
VIDEO : नागपुरात हत्येचा थरार; घटना सीसीटीव्हीत कैद - नागपूर क्राईम बातमी
रस्त्यावरील चिखल स्वच्छ करण्याच्या मुद्द्यावरुन झालेल्या वादात धर्मकाटा कार्यालयात काम करणाऱ्या कॉम्पुटर ऑपरेटरने सुरक्षा रक्षकावर फावड्याने प्राणघातक हल्ला केला. यात सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
![VIDEO : नागपुरात हत्येचा थरार; घटना सीसीटीव्हीत कैद](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4115529-thumbnail-3x2-nagpur.jpg)
कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील चिखली ले आउटमध्ये 'मेहता' वजन काट्याचे कार्यालय आहे. येथे कळमना परिसरात येणाऱ्या ट्रकमधील मालाचे वजन करण्यात येते. याच वजन काट्यावर मृत 50 वर्षीय नारायण भिवापुरकर हे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. तर आरोपी 21 वर्षीय गोलू वासनिक हा संगणक चालक म्हणून येथे कार्यरत आहे. कार्यालयासमोरील चिखल स्वच्छ करण्यावरुन या दोघांत वाद सुरू झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपी गोलू वासनिक याने लोखंडी पाता असलेला फावड्याने नारायण भिवापूकर यांच्यावर जोरदार प्रहार केला. यामध्ये नारायण जबर जखमी झाले.
नारायण यांना वाचवण्यासाठी काहीजण समोर आले. परंतु आरोपी गोलू वासनिक याने त्यांच्यावरही फावडा उगारला. नारायण यांच्यावर वार करुन गोलू वासनिक याने घटनास्थळाहून पळ काढला. उपस्थितांनी जखमी नारायण यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी नारायण यांना मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी आरोपी गोलू वासनिक याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.