नागपूर- पश्चिम विदर्भानंतर आता उपराजधानी नागपुरातही कोरोना रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नागपूरच्या पाठोपाठ वर्धातही नव्याने बाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. गुरूवारी पूर्व विदर्भात 1394 नवीन बाधितांची भर पडली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण नागपुरात 1116, तर वर्ध्यात 189 रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच नागपूर जिल्ह्यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना -
नागपूर शहरात 826, तर ग्रामीण भागात 228 रुग्णांना कोरोनाची नव्याने लागण झाली आहे. सर्वच स्तरावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पाऊले उचलणार असल्याचे सांगितले जात आहे. पण रुग्णसंख्या आणि मृत्यूचे आकडे वाढतच आहे. यात नागपूर जिल्ह्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरात 9, तर ग्रामीण भागामध्ये 2 आणि जिल्ह्याबाहेरील 2 मृतकांचा समावेश आहे.
वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू चिंता वाढवणार -
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्येत वाढ 2020 या वर्षात सप्टेंबर महिन्यात नोंदवण्यात आली होती. त्यावेळी दररोज हजार पार रुग्ण आढळून येत होते. मागील दोन दिवसात रुग्णसंख्या ही हजार पार असल्याचे आकडेवारीत समोर येत आहे. यात बुधवारी 10 जणांचा मृत्यू असताना गुरुवारी पुन्हा 13 जणांचा मृत्यूची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली असून ही बाब प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे.