नागपूर :अजनी पूल दक्षिण-पश्चिम नागपूरला पूर्व नागपूरसोबत जोडतो. अजनी पुलाचे वय साधारणपणे १४० वर्ष इतके आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अरुंद ठरत असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. ब्रिटिशांनी पुढील शंभर वर्षांचा अंदाज घेऊन बांधलेल्या या पुलाची उपयोगीता संपून ४० वर्ष अधिकचे झाले आहे. त्यानंतर आता रोप-वे तंत्रज्ञानाने तयार केला जाणारा लक्ष्मण झुला पूल तयार करण्याचे काम सुरू आहे.
पूल जड वाहनांसाठी बंद :ब्रिटिशांनी नागपूर शहरातील दोन महत्त्वाच्या उड्डाण पुलांचे निर्माणकार्य केले होते. त्यापैकी पोद्दारेश्वर राम मंदिराजवळही उड्डाणपूल सात वर्षांपूर्वीच बांधण्यात आला होता. मात्र,अजनी पुलाच्या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात येत नसल्याने नागरिकांना अनेक प्रकारचे त्रास सहन करावा लागत होता. ब्रिटिशांनी जेव्हा हा पूल बांधला होता. त्यावेळी साधारण तीन टन वजनाचे ट्रक घेऊन जाण्याची परवानगी होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात ५० ते ६० टन वजनाची जड वाहने या पुलावरून जात होती, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. म्हणून वाहतूक विभागाने पूल जड वाहनांसाठी बंद केला.
२१ महिन्यात तयार होईल लक्ष्मण झुला :रामझुला तयार झाल्यामुळे नागपूर शहरातील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. रामझुला यशस्वी झाल्याने आता अजनी रेल्वे स्थानका जवळ लक्ष्मण झुला बांधण्यात येणार आहे. अजनी ते मेडिकल चौकापर्यंतच्या या पुलाची लांबी २८३ मीटर राहणार असून २१ महिन्यांत त्याचे काम पूर्ण केले जाईल. पुलाच्या निर्माण कार्यासाठी साधारपणे ३३३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.