नागपूर - नागपूर जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आणि कोरोनाच्या पहिल्या लाटेत दररोज मृत्यूने शंभरी गाठलेले शहर म्हणून पाहायला मिळाले. एकाच दिवसात 112 जण हे कोरोनाने मृत्यू झालाले नागपूरकरांनी पाहिले आहेत. दिवस-रात्र पेटलेले स्मशान पाहिले. दरम्यानच्या काळात एप्रिल महिन्यात उपराजधानीवर मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. तेच मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती सुधारताना दिसली. 18 जूनला आलेल्या अहवालात मृत्यूची संख्या शून्य होती. पण असे असले तरी फेब्रुवारीनंतरच्या साडेचार महिन्यात 4 हजार 824 मृत्यू झाले आहेत.
नागपूरमध्येच शून्य मृत्यूची नोंद म्हणजे दिलासा
नागपूर शहराची लोकसंख्या जवळपास 25 लाखाच्या घरात, तर जिल्ह्याची लोकसंख्या 46 लाखाच्या घरात आहे. यात पहिल्या लाटेत ग्रामीण भाग असो की शहरी, कोरोनाची भिती आणि निर्बंध अधिक कडक राहिले. दुसऱ्या लाटेची तीव्रता पाहता पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिकच. यात पहिल्या लाटेनंतर 7 फेब्रुवारीला 1 लाख 49 हजार 788 जण हे बाधित आढळले. त्यात मृत्यूची संख्या त्या दिवशी शून्य राहिली. ज्या शहराने एका दिवसात 112 मृत्यू पाहिले. तिथे शून्य मृत्यूची नोंद हे दिलासादायकच म्हणावे लागले.
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत दुप्पट रुग्ण
नागपूर जिल्ह्यात पहिल्या लाटेत 28 फेब्रुवारीपर्यंत कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 49 हजार 788 इतकी होती. तेच 7 फेब्रुवारीला बाधितांची संख्या 1 लाख 36 हजार 98 इतकी होती. फेब्रुवारी महिन्यात 13690 जणांना कोरोनाची लागण झाली होती. मार्च महिन्यात 2 लाख 29 हजार 668 संख्या झाली. हाच आकडा 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 7 हजार 787 पर्यंत पोहोचला. एप्रिल महिन्यात सर्वाधिक 1 लाख 78 हजार 119 जण बाधित झाले. म्हणजे एप्रिलमध्ये पहिल्या लाटेतील बाधितांचा उच्चांक मोडीत निघाला. तेच मे महिन्याच्या अखेरीस 4 लाख 74 हजार 605 रुग्णसंख्या झाली. 66 हजार 818 जण बाधित झाले. तर 18 जूनपर्यंत 4 लाख 76 हजार 606 कोरोना बाधितांची नोंद झाली. या 18 दिवसात केवळ 2001 जण बाधित झाले. जी संख्या सर्वाधिक कमी आहे. 7 फेब्रुवारीनंतर साडेचार महिन्याच्या कालावधीत 3 लाख 26 हजार 818 बाधित झाले. जी रुग्णसंख्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुपट्टीपेक्षा अधिक आहे.