नागपूर:विदर्भात गेल्या काहि दिवसांपासून जोरदार गारपिट सुरु आहे. या मुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. नागपूर परिसरातील भाजीपाला आणि कापसाला या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. गारपिटीमुळे पिकांचे नेमके किती नुकसान झाले आहे याच्या पाहणीसाठी सर्वेक्षण केले जात आहे, असे कृषी विभागाचे अधिकारी पंकज लोखंडे यांनी सांगितले. गारपिटीमुळे 11 एकर क्षेत्रावरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. अधिकारी सर्वेक्षण करत आहेत, असे शेतकरी गजानन ठाकरे यांनी सांगितले आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. जिल्ह्यातून प्राथमिक अहवाल मागविण्यात आला आहे. आज राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास तसेच क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार हे गारपीटग्रस्त भागात जाऊन दौरा करत आहेत. महसूल विभागाच्या पद्धतीनुसार नुकसानीचे पंचनामे केले जाणार असून तात्काळ मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केदार यांनी म्हणले आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ घ्यावा असं देखील त्यांनी सुचवले आहे
दीड हजार हेक्टरमधील तुरीचे नुकसान
जिल्हाधिकारी आर. विमला यांनी महसूल यंत्रणेला यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. रामटेक, सावनेर ल,नागपूर ग्रामीण,कामठी, पारशिवनी, या तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहेत. कोणत्या भागात किती नुकसान झालं आहे,या संदर्भातील आकडेवारी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाली. त्यानुसार जवळपास ७ हजार ४३१ हेक्टर क्षेत्रांमध्ये कापूस,गहू,हरभरा, तूर, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. ८ हजार ३३४ शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पावसाने सर्वाधिक फटका तुरीला बसला असून दीड हजार हेक्टरमधील तुरीचे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने दिला होता अलर्ट
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये गारपीटीचे संकेत देण्यात आले होते. सर्वाधिक फटका सावनेर, कामठी, पारशिवनी, रामटेक, तालुक्यात रब्बी पिकाला बसला आहे. बोर आणि आवळ्याच्या आकाराची गारपीट काही भागात झाली आहे. जवळपास एक तासभर मंगळवारी अवकाळी पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काही गावांमध्ये नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी महसूल यंत्रणेशी संपर्क साधून झालेल्या नुकसानाची आकडेवारी जमा करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.
नेत्यांचे दौरे सुरू
सुनील केदार यांच्या दौऱ्यात ते नागपूर तालुक्यातील बोखारा, गुमथळा, बैलवाडा, कामठी तालुक्यातील गुमती, लोणखेरी, खापा, सावनेर तालुक्यातील दहेगाव पारशिवनी तालुक्यातील इटगाव भागीमहारी रामटेक तालुक्यातील जमुनिया, टुयापार, घोटी, फुलझरी आदी गावांना भेटी देणार आहेत.