नागपूर- राज्यात अनलॉकची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जात आहे. त्यामुळे, बहुतांश शासकीय सेवा पूर्ववत झाल्या आहेत. सुरवातीच्या काळात सामाजिक अंतर राखून सुरू झालेली एसटी बस आता पूर्ण क्षमतेने धाऊ लागली असताना, आता नागपूर वरून राज्याच्या इतर महानगरांसाठी बसेसच्या फेऱ्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता नागपूर-पुणे आणि पुणे-नागपूर दरम्यान दिवसाला दहा शिवशाही बसेस धावायला सुरुवात झाली आहे.
प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे विभागीय संचालक नितीन बेलसरे यांनी सांगितले. सध्या रेल्वे सेवा पूर्ववत झाली नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय सुरू आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना प्रवाशांसमोर फारसे पर्याय उपलब्ध नसल्याने आता याचा थेट फायदा घेण्याची योजना आखली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाकडून पुणे करिता दहा शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या आहे.