नागपूर :नागपूरसह विदर्भातील जनतेला प्रखर उन्हाची सवय जरी असली, तरी तापमानाचा पारा ज्या वेगाने वर चढतोय ते बघता नागरिकांसमोरील अडचणी देखील वाढणार आहेत. आता जेमतेम फेब्रुवारी महिनाच सुरु असला, तरी नागपूर आणि विदर्भात मात्र कडक उन्हाचे चटके आतापासूनच जाणवायला लागले आहे. यंदाच्या मोसमात थंडी केवळ काही दिवस पडल्याने उन्हाळ्याची सुरवात लवकर झाली आहे. सुर्यनारायणाने विदर्भात आग ओकायला नुकतीच सुरवात केली आहे.
विदर्भातील शहरांचे तापमान : नागपूरचे कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस पर्यत गेले आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात तापमानाचा पारा ४० डिग्री पेक्षा वाढेल, अशी शक्यता नाकारता येत नाही.तापमान वाढीचा परिणाम विदर्भातील सर्वच शहरात जाणवत आहे. आज अकोला शहराचे कमाल तापमान ३८.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले, तर अमरावतीचे तापमान ३७.२ डिग्री इतके होते. याशिवाय बुलढाणा ३५.५, चंद्रपूर ३६.६, गडचिरोली ३३.८, गोंदिया ३६.२, नागपूर ३५.२, वर्धा ३६, वाशीम ३७.७ आणि यवतमाळ ३५.५ डिग्री इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
सरासरीपेक्षा 2 डिग्री तापमान वाढण्याची शक्यता :गेल्या 15 दिवसात ऊन वाढल्यामुळे तापमान देखील वाढले आहे. मात्र, उन्हाची दाहकता यावर्षी प्रखर उन्हाळ्याची साक्ष देत आहे. सध्या तापमान वाढायला सुरवात झाली असली, तरी या वर्षीचे तापमान सामान्यांपेक्षा २ डिग्रीने जास्त राहण्याची शक्यता आहे. दिवसा प्रखर ऊन, रात्री गारवा अशी परिस्थिती आहे. उत्तरेकडे हिमवृष्टी होत आहे, त्याचा थोडासा प्रभाव विदर्भात दिसत आहे. दिवसाला प्रखर ऊन, रात्री गारवा अशी परिस्थिती विदर्भात निर्माण झाली आहे.
रस्त्यांवरील वर्दळ झाली कमी :तापमानाचा पारा वर चढू लागताचं रस्त्यांवरची वाहनांची वर्दळ हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली आहे. वाहतूक सिग्नलवरील वाहनांची संख्या कमी दिसत आहे. झाडाच्या सावलीत अधिक वाहने उभी असतात. हिवाळा संपला, आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाचा कडाका येथून पुढे वाढत जाणार आहे. सूर्य आतापासूनच आग ओकायला लागल्यासारखा अनुभव येत आहे. मागील 15 दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. मार्च हा महिनादेखील चांगलाच तापमान वाढविणारा असेल, असे स्पष्ट संकेत आतापासून मिळायला लागले आहेत. आधीच तापणाऱ्या उपराजधानीतील जनतेला यंदाचा उन्हाळा चांगलाच जड जाणार, असे दिसायला लागले आहे.
हेही वाचा : Thackeray Vs BJP : सूडाच्या राजकारणाचा बदला! 'ते' भाजपला मिळाले, आणि दोषमुक्त झाले, आता ठाकरे निशाण्यावर