नागपूर - भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात मोहन भागवत यांची भेट घेतली. तब्बल ३० मिनिटे दोघात चर्चा झाली. राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाले आहे. सत्ता स्थापनेबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत खलबते सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुनगंटीवारांची संघ नेत्यांशी होणारी भेट महत्त्वाची मानली जात होती. पण, ही भेट वैयक्तिक कारणांसाठी असल्याचे स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिले.
हेही वाचा -सत्तेसाठी आतुर काँग्रेस म्हणते.. 'शायद दुश्मन भी मोहब्बत कर बैठे'
शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीला भाजपने दाद दिली नाही. त्यामुळे शिवसेना आणि आघाडीमध्ये सत्ता स्थापनेबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे. या दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. तिन्ही पक्षात सत्तेच्या वाटाघाटी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकार स्थापन होईल, असा विश्वास दोन्हीकडचे आमदार व्यक्त करत आहेत. पण, प्रमुख नेत्यांकडून मात्र कुठलेही स्पष्ट वक्तव्य करण्यात आले नाही.
हेही वाचा -उद्धव ठाकरेंनी घेतली काँग्रेस नेत्यांची भेट; सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाल्याची शक्यता
या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात मात्र शांतता आहे. दिल्लीतील नेतृत्व सत्ता स्थापनेविषयी उत्सुक असल्याचे सध्यातरी दिसत नाही. राज्यातल्या नेत्यांकडूनही कुठली हालचाल होताना दिसत नाही. अशात भाजपची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडे मुनगंटीवारांचे जाणे चर्चेचा विषय ठरत आहे. पण, चर्चेविषयी अधिक माहिती देण्यास मुनगंटीवारांनी टाळाटाळ केली. या चर्चेनंतर भाजप सत्तास्थापनेविषयी हालचाल करते का हे पाहावे लागेल.