नागपूर - काँग्रेस पक्षाची 'एक्सपायरी डेट' संपली आहे. मात्र, काँग्रेस पक्षातही काही सेवाभावी नेते आहेत, अशा सेवाभावी नेत्यांना आम्ही आमच्या पक्षात घेणार, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नागपूरातील पत्रकार परिषदेत बोलताना सुधीर मुनगंटीवार...
औषधाची ज्याप्रमाणे एक्सपायरी डेट संपते, त्याचप्रमाणे काँग्रेसचीही एक्सपायरी डेट संपली आहे, त्यामुळे काँग्रेसमधील 'राईट पर्सन, राईट पक्षात' येतील. मात्र 'राँग पर्सन, राँग पक्षातच' राहतील असेही मुनगंटीवार म्हणाले.
काँग्रेसचे नवनियुक्त खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपुरातील दारूबंदी उठवण्याची मागणी केली आहे. यावर 'काँग्रेसच्या सदस्य पदाच्या पावतीवर, मी दारू पिणार नाही, अशी पहिली अट आहे'. त्यामुळे हे पावती पुस्तक आता त्यांना फाडून टाकावे लागतील. असा टोलाही मुनगंटीवार यांनी यावेळी लगावला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघववीत यश मिळवत एकहाती सत्ता मिळवली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुजय विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपबरोबर संसांर मांडला. त्यानंतर त्यांना निवडणुकीत यशही मिळाले. याचा फायदा भाजपला झाला. देशभरात सद्या इतर पक्षातून भाजपमध्ये सामील होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.