नागपूर Salim Kutta :शिवसेनाठाकरे गटाचे नाशिकमधील पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत संबंध असल्याचा आरोप भाजपा आमदार नितेश राणेंनी केला आहे. सलीम कुत्ता पॅरोलवर बाहेर असताना त्यानं बडगुजर यांच्यासोबत पार्टी केल्याचं नितेश राणेंनी म्हटलं. सलीम कुत्ता हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील एक प्रमुख आरोपी आहे.
पार्टीचे फोटो विधानसभेत दाखवले : नितेश राणे यांनी या दोघांच्या पार्टीचे फोटो विधानसभेत दाखवले. विधानसभेतील चर्चेदरम्यान नितेश राणे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. "मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत सुधाकर बडगुजर याचे संबंध काय? सुधाकर बडगुजर हे सलीम कुत्तासोबत पार्टी करताना दिसत आहेत. बडगुजर यांना कोण पाठिशी घालतंय? त्यांचा पॉलिटीकल गॉडफादर कोण? या प्रकरणाची चौकशी व्हावी", अशी मागणी नितेश राणेंनी सभागृहात केली.
सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण : नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांवर आता सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय. वेगळ्या विदर्भाची मागणीसाठी सभा होती आणि त्यावेळी आम्ही आंदोलन केलं होतं. त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल केले होते. माझ्यासह अनेक लोक जेलमध्ये होते. त्यावेळी बॉम्ब स्फोटातील आरोपीपण जेलमध्ये आहेत हे आम्हाला माहिती नव्हते. माझ्यावर एक साधी 'एनसी'सुद्धा दाखल नव्हती. राजकीय हेतुनं प्रेरित होऊन गुन्हे दाखल केले होते. सलीम कुत्ता याला 93 मध्ये अटक केली होती. त्यामुळे ते कैदी म्हणून होते. बेबनाव केला आहे तसेच व्हिडिओमध्ये मॉर्फिंग केले आहे. त्यामुळं सलीम कुत्ता याच्यासोबत माझे संबंध नाहीत, असं स्पष्टीकरण सुधाकर बडगुजर यांनी दिलंय.