नागपूर Student Rape Case Update :तपास लागत नसल्यानं पोलिसांनी आता आरोपीचं स्केच जारी केलं असून आरोपी संदर्भात माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. एवढंच नाही तर महाविद्यालयाच्या जवळ ज्या ठिकाणी बलात्काराची घटना घडली होती तो परिसर झाडी झुडुपांनी वेढलेला आहे. पुढे जंगलाचा भाग असल्यामुळे आरोपी नेमका कोणत्या मार्गाने पळून गेला आहे, याचा अंदाज यावा म्हणून पोलिसांनी दिवसा आणि रात्री ड्रोनचा वापर करून संपूर्ण परिसराचं मॅपिंग करणं सुरू केलं आहे.
एकूणच घटनाक्रम असा आहे :वर्धा येथे राहणारी तरुणी ४ ऑक्टोबर रोजी गावावरून जामठा परिसरात उतरली. जामठा परिसरातील महाविद्यालयात शिकत असल्याने ती बॅग घेऊन महाविद्यालय परिसरात असलेल्या होस्टेलमध्ये जात होती. रस्ता हा जंगली भाग असल्याने एका अज्ञात इसमाने तिचा पाठलाग सुरू केला. बराच वेळ तो तिच्या मागावर होता. आरोपीने त्याच्या जवळ असलेल्या कुऱ्हाडीचा धाक दाखवत तरुणीला बळजबरीने जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने तरुणीला कुऱ्हाडीने जखमी केलं नसले तरी झटापटीत तरुणीच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत.
बहिणीला दिली माहिती, पण अनर्थ घडला :आरोपी पाठलाग करत असल्याने धास्तवलेल्या तरुणीने आपल्या मोठ्या बहिणीला फोनवरून याबाबतची माहिती दिली. पीडित तरुणीच्या बहिणीने महाविद्यालय प्रशासनाला ही बाब कळविली. मात्र, तोपर्यंत अज्ञात इसमाने पीडित तरुणीवर अतिप्रसंग केला. बहिणीने फोन केल्यानंतर लगेचचं महाविद्यालयतील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने हिंगणा पोलिसांचे पथकही घटनास्थळी आले होते. या प्रकरणाची तक्रार हिंगणा पोलिसात करण्यात आली.