नागपूर- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे मद्यविक्रीची दुकाने, परमिट रूम आणि बियर बारही बंद ठेवण्यात आले आहे. हीच परिस्थिती मद्यपींसाठी त्रासदायक ठरत आहे की काय? असा प्रश्न पाडणारी घटना नागपूरात घडली आहे. नागपूरात रोज मद्यपान करण्याची सवय असलेल्या दोन जणांनी सदर परिसरातील सुविधा बारच्या मागील बाजूची भिंत तोडून आत प्रवेश करत लाखोंची दारू लंपास केली आहे.
लॉकडाऊनमुळे दुकाने बंद; दारूसाठी तळीरामांनी फोडले बार
नागपूरात रोज मद्यपान करण्याची सवय असलेल्या दोन जणांनी सदर परिसरातील सुविधा बारच्या मागील बाजूची भिंत तोडून आत प्रवेश करत लाखोंची दारू लंपास केली आहे. विशेष म्हणजे दोघांनी बारच्या आत असणाऱ्या इतर किमती ऐवज किंवा रोकडकडे लक्ष घातलेच नाही.
31 मार्चच्या पहाटेचे दोघांचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. त्यात दोघेजण बारमध्ये शिरल्यानंतर फक्त ब्रँडेड दारूच्या बॉक्सेसकडे लक्ष केंद्रित करून महागडी दारू एका पोत्यात भरून पोबारा करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दोघांनी बारच्या आत असणाऱ्या इतर किमती ऐवज किंवा रोकडकडे लक्ष घातलेच नाही.
त्यांची ही चोरी आर्थिक लाभासाठी नाही, तर लॉकडाउनच्या या कठीण काळात फक्त स्वतःची मद्यपानाची सवय भागवण्यासाठी करण्यात आली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान सदर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका तासात या दोन्ही चोरट्यांना अटक केली.