नागपूर -जीवघेणी स्पर्धा करणारे बाईकर्स आता प्रत्येक शहरात दिसून येत आहेत. नागपुरादेखील असे बाईकर्स मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. इतरांच्या जीवाचे मूल्य नसणाऱ्या एका बाईक चालवणाऱ्याने मित्रांसोबत लावलेली पैज एका तरुणीचा जीवावर बेतली आहे. विरुद्ध दिशेने दोन वेगवेगळ्या गाड्यांवर येणाऱ्या अल्पवयीन दुचाकी स्वारांनी तरुणीला जोरदार धडक दिली आहे. मयुरी पटले असे या तरुणीचे नाव आहे.
धडक दिल्याने अपघात -
मयुरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर स्कुटीने जात होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेने दोन वेगवेगळ्या गाड्यांवर येणाऱ्या अल्पवयीन दुचाकी स्वारांनी चुकीच्या दिशेने वेगाने गाडी चालवून तिला जोरदार धडक दिली. या अपघातात मयुरी सोबत अल्पवयीन बाईक चालक सुद्धा जखमी झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही वाहन चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, ते अल्पवयीन असल्यामुळे त्यांना दुचाकी सोपवून इतरांना धोक्यात घालणाऱ्या त्यांच्या पालकांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
आयसीयुमध्ये जीवन-मृत्यूशी सुरू आहे झुंज -
मयुरी राज्यस्तरीय धावपटू आहे. मयुरीने आतापर्यंत जिल्हा, विभागीय व राज्य स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली असून राष्ट्रीय स्पर्धेतही तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व केले आहे. तसेच मयुरी 'खेलो इंडिया'या केंद्र सरकारच्या तरुण खेळाडूंसाठीच्या स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळण्यासाठी लवकरच भोपाळला जाणार होती. त्यासाठीच ती आपली प्रमाणपत्रे कोच हरेंद्र ठाकरे यांच्याकडे देण्यासाठी दुचाकीने जात असताना दोन अल्पवयीन दुचाकी स्वारांनी मयुरीच्या दुचाकीला जबर धडक दिली. अपघात इतका भीषण होता की मयुरी रस्त्यावर फेकली गेली. ज्यामुळे तिच्या डोक्याला, मेंदूला, डोळे, नाक, हातपाय, पाठीला जबर दुखापत झाली. तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयुरी सध्या आयसीयुमध्ये जीवन-मृत्यूशी झुंज देत आहे.
मयुरीच्या मदतीला पुढे आलेत अनेक हात -
मयुरी ही स्वतःच्या जिद्दीने आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर खेळाच्या मैदानातून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असताना तिच्यावर ओढवलेल्या या प्रसंगामुळे ती रुग्णालयात पोहचली आहे. मयुरी लवकर बरी व्हावी आणि पुन्हा खेळाच्या मैदानात उतरवून आई वडिलांच्या स्वप्नांना बळ देण्याचा प्रयत्न करावा, याकरिता नागपूर शहरातील काही सामाजिक, राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अनेकांनी तर उपचारासाठी लागणार खर्च देण्याची तयारीदेखील दर्शवली आहे.
हेही वाचा - कोण होणार विधानसभा अध्यक्ष; तर कोणाच्या गळ्यात पडणार मंत्री पदाची माळ? काँग्रेसमध्ये खलबतं