नागपूर -भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मोहीमांची ( India space mission ) आतापर्यंतच्या अंतराळ प्रवासाची माहिती ही बस ( Istro Space on Wheels Bus) घेऊन आली आहे. या बसमध्ये चांद्रयान-1 मोहीम,मंगलयान मोहीम, ( Mangalyaan campaign ) अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसेच इस्त्रोने आतापर्यंतचा अंतराळ प्रवास आपल्याला पहायला मिळतो आहे. चांद्रयान, मंगलयान मोहीम राबविण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन, मोहीमेची माहिती तसेच ही मोहीम राबविताना आलेली आव्हाने याची माहिती देण्यात आली आहे.यासोबतच या बसमध्ये लावलेल्या स्क्रीनच्या माध्यमातून इस्त्रोचा ( ISRO ) प्रारंभापासून ते आतापर्यंतचा अंतराळ प्रवास विशद करण्यात आला आहे.
विज्ञानाविषयी जनजागृती - सर्वसामान्यांना इस्त्रो या संस्थेची माहिती व्हावी यासाठी या विज्ञान परिषदेत स्पेस आन व्हिल्स ठेवण्याचा उद्देश आहे. विशेषतः तरुणांमध्ये विज्ञानाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे. देशातील अत्यंत महत्वपूर्ण अशा विज्ञान विषयक प्रदर्शनात ही बस पाठवली जाते. विशेषतः तरुणाईचा अत्यंत उस्फूर्त असा प्रतिसाद स्पेस आन व्हिल्सला मिळत आहे.
गगनयान मिशनला विलंब - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात ‘गगनयान मिशन’ची घोषणा केली होती. ते लक्ष्य २०२२ मध्ये साध्य करावयाचे होते. तथापि, कोरोना महामारीमुळे विलंब झाला. त्यामुळे सहा महत्वपूर्ण चाचण्यांच्या यशस्वीतेनंतर मानव अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्याबाबत ठरवण्यात येईल, अशी माहिती इस्त्रोचे अध्यक्ष तसेच अंतराळ विभागाचे सचिव डॉ. एस. सोमनाथ यांनी पत्रपरिषदेत दिली. गगनयान मिशन अर्थात भारताकडून मानव अंतराळात पाठविण्याचे अभियान यासाठी संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण अशा चाचण्या झाल्यानंतरच या संदर्भातील निर्णय घेण्यात येईल,अशी माहिती त्यांनी दिली. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी अंतराळ विज्ञानावर आयोजित सत्रामध्ये भाग घेतला त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत संबोधित केले.
अंतराळ धोरणाची लवकरच घोषणा - भारताच्या अंतराळ धोरणाची लवकरच घोषणा करण्यात येईल. फेब्रुवारी २०२२ मध्ये अंतराळ धोरणाच्या पहिल्या मसुद्यावर चर्चा झाल्यानंतर अंतराळ विभागाने त्यावर काम केले. आता हा मसुदा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला आहे. हे धोरण लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाकडे जाण्यापूर्वी प्रधानमंत्री कार्यालय, संबंधित विभाग, मंत्रालयांशी सल्लामसलत करील,असे सोमनाथ यांनी सांगितले.
होलिस्टिक मॉडेल्स चर्चा - रोग निदान उपचारासाठी जिनोमिक्स, झेब्राफिश, तसेच मानवीकृत उंदीर, होलिस्टिक मॉडेल्स या नवपद्धतींच्या वापराबाबत रसायनशास्त्र विभागात सांगोपांग चर्चा करण्यात आली. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी गेथर्सबर्ग येथील डॉ.प्रसाद धुलिपाला उपस्थित होते. अनुवांशिक आजारांत कर्करोग,मतिमंदता, जन्म दोष, न्यूरोडीजनरेटिव्ह रोग इ. समाविष्ट होतात. जीनोमिक बदल ओळखणे, त्यात असलेली जीन्स निदान, उपचारासाठी मार्गदर्शक ठरेल. आनुवंशिक विकारांच्या निदानासाठी क्लिनिकल प्रयोगशाळांनी नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग (NGS) स्वीकारले आहे. NGS पद्धती उत्परिवर्तन शोधण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात अशी माहिती डॉ. प्रसाद धुलिपाला यांनी दिली.
रोग निदान, उपचारासाठी नवपद्धती -संवर्धन धोरणांचा वापर, एका जनुकाचे क्लिनिकल विश्लेषण, मल्टी-जीन पॅनेल किंवा सर्वज्ञात प्रोटीन कोडिंग जीन्स (एक्सोम सिक्वेन्सिंग) लागू केले जातील. याशिवाय श्रवणशक्ती कमी होणे, दृष्टी कमी होणे, हृदय, रक्तवाहिन्यासंबंधी विकार, मूत्रपिंडाचे विकार, न्यूरोलॉजिकल विकार, कर्करोगाची पूर्वस्थिती इ. साठीही हे तंत्र वापरले जाऊ शकते. संपूर्ण जीनोम अम्प्लीफिकेशन (WGA) पद्धतीमुळे रक्त, सूक्ष्म सुई आकांक्षा, बायोप्सी अभिलेखीय नमुने यांसारख्या नमुन्यांमधून जीनोमिक डीएनए तयार करणे शक्य होते. जलद, संवेदनशील विश्वासार्ह RNA प्रमाणिकरणासाठी नवीन पद्धती विकसित करण्याकडे लक्ष वेधले गेले आहे.
जागतिक दर्जाच्या डॉक्टरांची उपस्थिती -नेब्रास्का मेडिकल सेंटर (UNMC) च्या फार्माकोलॉजी, प्रायोगिक न्यूरोसायन्स विद्यापीठ येथील डॉ. संती गोरंटला, उत्तर टेक्सास युनिव्हर्सिटी ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस विभाग येथील डॉ. पुदुर जगदीश्वरन, बंगलोर येथील डॉ. सृजना नरमला आदीनी या चर्चासत्रात उपस्थित दर्शवली. डॉ.प्रसाद धुलीपाला यांच्या हस्ते वक्त्यांचा सत्कार करण्यात आला.
नव्या जीवनशैलीमुळे शरिरावर घातक परिणाम - हृदयविकार, मधुमेह नव्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विकारांमध्ये अलिकडच्या संशोधनातून नवीन घातक घटक असल्याचे निदर्शनास आले आहेत. हे घटक वेळीच ओळखून सजग राहून आपला बचाव करावा, असे प्रतिपादन डॉ. शंतनू सेनगुप्ता यांनी केले.भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात ‘हृदयविकार, मधुमेह या विषयातील नवीन संशोधन’ याविषयावर चर्चा झाली. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. जी. वसिष्ट हे होते. तर या चर्चासत्रात डॉ. शंतनू सेनगुप्ता, डॉ. सुनील गुप्ता या तज्ज्ञांनी सहभाग घेतला. हे दोन्ही मान्यवर नागपूरकर आहेत.