नागपूर- देवेंद्र फडणवीस यांच्या नामांकन अर्जावरील प्रतिज्ञापत्राची नोटरीची मुदत २०१८ मध्येच संपलेली आहे. त्यांनी अर्ज दाखल करताना चुकीची माहिती दिली. त्यामुळे दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी संबंधित पोलीस ठाण्यात फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थित सुनावणी चालू होती. मात्र, निवडणूक आयोगाने देशमुखांची मागणी फेटाळत मुख्यमंत्र्यांचा अर्ज वैध ठरवला आहे.
काय होता देशमुखांचा आरोप? -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नामांकन अर्जावरील नोटरीची मुदत २०१८ मध्येच संपली. त्यामुळे त्यांचा अर्ज नाकारण्यात यावा, यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला होता. तसेच निवडणूक आयोगाचे अधिकारी फडणवीस यांच्या दबावाखाली आहेत. देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील या सर्वांच्या मतदारसंघातील निवडणूक आयोगाचे अधिकारी अंत्यत दबावाखाली आहेत. त्यामुळे फडणवीस सरकार बरखास्त करण्यात यावे, असे देखील देशमुख म्हणाले.