नागपूर - रुग्णासोबत आलेल्या व्यक्तीस डॉक्टरने मास्क घालण्यास सांगितल्यामुळे वाद निर्माण झाला. या वादातून तीन व्यक्तींनी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे एका खासगी रुग्णालयात घडली.
खासगी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरने रुग्णासोबत आलेल्यांना मास्क घालण्यास सांगितल्याने वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन रुग्णासोबत आलेल्या व्यक्तींनी डॉक्टरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. घटनेनंतर मारहाण झालेल्या डॉक्टरने मारहाण करणाऱ्यांविरोधात कळमेश्वर पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, नंतर दोन्ही पक्षात समझोता झाल्याचे सांगत डॉक्टरने पोलीस तक्रार परत घेतली आहे.
'मास्क घाला' म्हणणाऱ्या डॉक्टरला मारहाण; नागपूरमधील प्रकार दरम्यान, मारहाणीच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ऑडिओ नसल्याने घटनेच्या वेळी नेमका वाद कशावरुन झाला? हे स्पष्ठ नाही. मात्र, मास्क घालायला सांगितले म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरने केला आहे.
तर दिवसेंदिवस नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. रविवारी दिवसभरात नागपूर जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वाधिक २ हजार ३४३ रुग्णांची नोंद झाली आहे. एकाच दिवसात तब्बल २ हजार ३४३ रुग्ण वाढल्याने नागपुरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५२ हजार ४७१ इतकी झाली आहे. महत्वाचे म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या १३ दिवसांमध्ये २२ हजार ८५६ रुग्णांची भर पडली आहे. तर ६३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.