नागपूर -कोरोनाची झळसर्वसामान्य कुटुंबांना कशी बसली, हे आपण रोज पाहतो आहे. अनेक जण हे स्वतः अनुभवत आहे. पण याची झळ लहान मुलांना कशी बसत आहे, हे जाणून घेण्यासाठी या चिमुकलीचे पत्र वाचावे लागेल. सहाव्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्या इशिका भाजेने एक पत्र लिहीले आहे. ही व्यथा केवळ तिची नसून महाराष्ट्रातील कित्येक घरातील अशाच इशिका आणि त्यांच्या पालकाची ही व्यथा आहे.
नागपूरातील नरसाळा भागात सत्यसही विद्या मंदिरात सहाव्या वर्गात शिकणारी इशिका ही लॉकडाऊनमुळे घरात आहे. शाळा बंद असल्याने तिने काही दिवस ऑनलाईन क्लास केले. पण अभ्यासात हुशार असणारी इशिका ऑनलाईन क्लासला हजर राहणे बंद झाले. तिच्या गैरहजेरीबाबत तिचे वर्ग शिक्षक खंडारे यांनी चौकशी केली. तेव्हा इशिकाने वर्ग शिक्षकांना घरातील बिकट परिस्थिती सांगितली. हे शाळेला का कळवले नाही, असे विचारले तेव्हा तिने ही परिस्थिती पत्रात लिहून मुख्यध्यापकांना कळवली.