नागपूर -दिशा सालियन मृत्यूचे प्रकरण चांगलेच पेटले आहे. या प्रकरणाचे पडसाद आज गुरुवार (दि. 22 डिसेंबर)रोजी विधानसभेत उमटले. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी काल आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला (A U) नावाने 44 फोन आले होते, हा (AU) म्हणजे आदित्य-उद्धव (Aditya-Uddhav Thackeray) असल्याची बिहार पोलिसांनी (Bihar Police) माहिती दिल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिली आहे. त्यानंतर हे प्रकरण चांगले कापले.
विधानसभेत पडसाद -खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या आरोपानंतर आज विधानसभेत याचे पडसाद उमटले. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. दिशाच्या मृत्यूपूर्वीच्या पार्टीत कोण कोण होते? पार्टीत मंत्री कोण होते? आणि हा तपास कुणाच्या राजकीय दबावामुळे थांबला? याची चौकशी करण्याची मागणी यामध्ये केली आहे.
आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा -दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. सुशांत सिंग, दिशा सालियान प्रकरण समोर येते तेव्हा आदित्य ठाकरे यांचेच नाव का घेतले जाते? असा सवाल उपस्थित करत दाल मे कुछ काला है असे राणे म्हणाले आहेत. तर ए फॉर आदित्य म्हणत शेवाळेंच्या आरोपांना राणेंनी दुजोरा दिला आहे. तसेच, मुंबई पोलिसांनी दिशा सालियन केस रिओपन करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नितेश राणेंपाठोपाठ बडनेराचे आमदार रवी राणाही आदित्य ठाकरे यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. उद्या विधिमंडळात आवाज उठवणार असल्याचे रवी राणा यांनी सांगितले आहे.