नागपूर: धीरेंद्र कृष्णशास्त्री यांनी चॅलेंज स्वीकारले आहे. पण याला चॅलेंज स्वीकारणे म्हणत नाही. चॅलेंजच्या सगळ्या अटी कागदावर लिहिलेल्या असून एका वैज्ञानिक पद्धतीने दिलेले चॅलेंज आहे. याची संपूर्ण प्रक्रिया ही 'फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन'खाली पार पाडावी लागते. एका सुरक्षित वातावरणामध्ये हे चॅलेंज पार पाडले जाईल. ते महाराजांच्या दरबारामध्ये शक्य नाही. महाराजांनी नागपुरात यावे आणि पत्रकारांसमोर, एका तटस्थ पंच कमिटी समोर या आव्हानांची प्रक्रिया पार पाडली जाईल, असे श्याम मानव म्हणाले.
काय आहे आव्हान?:महाराजांनी दावा केला त्यानुसार त्यांच्या समोर ऐनवेळी दहा माणसे सादर केली जातील. त्यांची नावे, वय, त्यांच्या वडिलांचे नाव आणि फोन नंबर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांनी सांगावे. तश्या पद्धतीचे दावे त्यांनी त्यांच्या दिव्य दरबार केले आहेत आणि ते व्हिडिओज उपलब्ध देखील आहेत. याशिवाय आपल्या भक्ताच्या घरामध्ये जाऊन कोणत्या रूममध्ये कोणत्या कपाटात काय ठेवले आहे हे देखील महाराज ओळखतात. मग, शेजारी एका रूममध्ये दहा वस्तू ठेवल्या जातील. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होत राहील आणि त्या वस्तू त्यांनी ओळखून दाखवायच्या आहेत. ही प्रक्रिया दोनदा पार पाडली जाईल. पहिल्यांदा ते 90% सत्य ओळखावे लागेल. पहिल्यांदा ते 90% सत्य सांगू नाही शकले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली तर पाच दिवसांनंतर दुसऱ्यांना ही प्रक्रियेवर पाडली जाईल, असे श्याम मानव यांनी स्पष्ट केले आहे.
तीस लाखांसाठी तीन लाख भरावे लागतील:आम्ही दिलेल्या आवाहनानुसार तीस लाख रुपयांचे पारितोषिक हवे असेल तर तीन लाख रुपये डिपॉझिट ठेवावे लागतील आणि त्यांना जर पारितोषिक नको असेल तर केवळ दिव्य शक्ती सिद्ध करण्यासाठी ते पुढे येऊ शकतात. तरीही आम्ही या संपूर्ण प्रक्रियेचा आयोजन करू. मात्र, डिपॉझिट भरल्यानंतर ते आपला दावा सिद्ध करू शकले नाहीत तर डिपॉझिट रक्कम अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बँक खात्यात जमा होईल असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन: दिव्य शक्तीचा दावा ते नेहमीच करत असतात. त्यांचा हाच दावा सिद्ध करायचा असले तर फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन खालीच खाली करता येईल. त्यासाठी पंडित धिरेंद्र कृष्णा शास्त्रींनी त्यांच्या सोयीने नागपुरात यावे. त्यांची संपूर्ण व्यवस्था ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून केली जाईल, असे देखील श्याम मानव यांनी स्पष्ट केले आहे.
रायपूर नाही तर नागपुरात दावा सिद्ध करा: छत्तीसगड राज्यातील रायपूरमध्ये 20 आणि 21 जानेवारीला बागेश्वर धामचा दिव्य दरबार भरवला जाणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना दरबारात आमंत्रित करण्यात आल्याची माहिती पंडित धीरेंद्र कुमार शास्त्रींनी दिली आहे. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून ही शक्यता फेटाळून लावली आहे. दावा सिद्ध करण्यासाठी एका त्रयस्थ ठिकाणची गरज आहे,नागपूर हे पोल खोल शहर असल्याने त्यांनी नागपुरात येऊन आपला दावा सिद्ध करावा.
तर मी त्यांच्या पायावर डोक ठेवेल:फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन अंतर्गत पंडित धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांनी दिव्यशक्ती सिद्ध करून दाखवल्यास मी स्वतः त्यांच्या पायावर डोके ठेवून जाहीर माफी मागेल आणि 40 वर्षांत जी संस्था अंधश्रद्धा निर्मूलन समिती उभी केलेली आहे, ती क्षणात बंद करेल असे देखील श्याम मानव म्हणाले.
महाराजांवर पळपुटे असल्याचा आरोप: बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री हे पळपुटे आहेत. त्यांनी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आयोजित रामकथा नियोजित वेळेत पूर्ण न करता दोन दिवसांआधीच गुंडाळून पळ काढल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. तेव्हापासूनचं पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीत सुरू झालेला वाद रोज नवनवीन वळण घेत आहे.