नागपूर -राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदी दरम्यान नागपूर जिल्ह्यात अनेक नागरिक किराणा किंवा जीवनावश्यक सामुग्री खरेदी करण्याच्या नावाखाली सर्रासपणे बाहेर निघत असल्याने रस्त्यांवरील गर्दी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे, संचारबंदीचा फज्जा उडत होता, त्यामुळे सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याने आता प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंतच सुरू ठेवता येईल, असे आदेश निर्गमित केले आहेत.
हेही वाचा -नागपूर जिल्ह्यात 6 हजार 364 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 113 मृत्यू
दुकाने/आस्थापने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येणार
आजपासून हा आदेश लागू झाल्याने नागपूरच्या महत्वाच्या बाजारपेठ असलेल्या इतवारी, सीताबर्डी भागातील व्यापाऱ्यांनी याला चांगला प्रतिसाद दिला. नागपूरची परिस्थिती हाताबाहेर जात असताना नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. नागपूर शहराच्या हद्दीत कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता प्रतिबंध करण्यासंदर्भात उपाययोजना करणे आवश्यक असल्याने नागपूर महानगरपालिकेकडून काही महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवेशी निगडीत असलेली सर्व दुकाने (मेडीकल दुकाने वगळून ) सम/विषम तत्वावर सुरू ठेवता येतील, हा आदेश रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने वाढत असल्याने त्यावर आवश्यक उपाययोजना म्हणून अत्यावश्यक सेवशी निगडीत दुकाने/आस्थापने केवळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे.