नागपूर - विदर्भात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रपती राजवटीत केंद्र सरकारचे अधिकार वाढत असले तरी आम्ही संसदेत खासदार आहोत. त्यामुळे राज्यातील गंभीर परिस्थिती केंद्र सरकारच्या कानावर घालून शेतकऱ्यांना गतीने सरकारी मदत कशी मिळेल, हे पाहण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही पवार म्हणाले.
आज शरद पवार यांनी नागपूरमधील काटोल विधानसभा क्षेत्रातील ओल्या दुष्काळाची पाहणी केली. तसेच ज्या संत्र्याच्या बागांचे नुकसान झाले आहे, त्याचीही पवार यांनी पाहणी करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाहणी दौऱ्यादरम्यान चारगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही, कोणी पाहणी करायला आले नाही, पिकाला भाव नाही, अशा व्यथा हवालदिल शेतकऱ्यांनी मांडल्या.