नागपूर - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटला नाही. विधानसभेचा निकाल लागून २० दिवस उलटून गेले तरी राज्यात कोण सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झाले नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिघांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याने सत्ता स्थापनेच्या चर्चा नेमक्या कोणत्या दिशेने सुरू आहेत, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी शरद पवार यांना एका कार्यकर्त्याने प्रश्न विचारला की, येत्या १७ नोव्हेंबरला राज्याचा इतिहास बदलावा, अशी आमची अपेक्षा आहे. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, या गोष्टीला वेळ लागेल, धोरणात्मक गोष्टींवर चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सत्तास्थापनेची वाटचाल कुठल्या दिशेने जाईल याचे गुढ वाढले आहे.