नागपूर -नागपूर शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गवळीपुरा येथे एका भावाने दुसऱ्या भावाचा खून केल्याची घटना घडली होती. याची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळ गाठल्यानंतर पोलीसांसमोर भलताच पेच निर्माण झाला. घटनास्थळी खून झाल्याचे कोणतेही पुरावे नसल्याने खुनाचा गुन्हा दाखल करायचा तरी कसा, हा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच खुनाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मीच भावाचा खून केला -
हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असल्याने पोलिसांनी कोणतीही घाई गडबड न करता या घटनेचा तपास सुरू केला आहे. नागपूर शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुदाम नगरी भागात तीन भाऊ जुगार खेळत होते. सेवानंद, देवानंद आणि परमानंद यादव असे या तीन भावंडांची नावे आहेत. हे तिघेही दारूच्या नशेत होते. त्याच वेळी शंभर रुपयांवरून यांच्यात वाद झाला. त्यापैकी सेवानंद रोशनलाल यादव यांचा अचानक मृत्यू झाला. त्यावेळी परमानंद याने घराबाहेर येऊन मी सेवानंदचा गळा दाबून खून केल्याची ओरड सुरू केली. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या लोकांनी घरात जाऊन बघितले तेव्हा सेवानंद हा मृत अवस्थेत पडलेला होता. पोलिसांना घटनेची सूचना मिळताच तेदेखील घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळीदेखील परमानंद हा मीच भावाचा खून केल्याचे बोलत होता. मात्र, त्यावेळी तो इतका दारू पिलेला होता की, त्याला नीट बोलतादेखील येत नव्हते. तो स्वतःच्या पायावरही उभा राहू शकत नव्हता, त्यामुळे तो खून कसा काय करू शकतो, असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यानंतर पोलिसांनी स्वयंघोषित आरोपी परमानंद यादव याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.