महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 14, 2021, 12:21 PM IST

Updated : Jan 14, 2021, 12:58 PM IST

ETV Bharat / state

पालखी महामार्गांच्या सुशोभीकरणासाठी सूचना पाठवा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आवाहन

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या नावाने महाराष्ट्रात निर्माणाधीन असलेल्या दोन पालखी महामार्गांचा सर्वंकष विकास आणि सुशोभीकरण यासाठी सूचना पाठवण्याचे आवाहन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ‘या दोन महामार्गांचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेता त्यांचे सुसंगतरीत्या सुशोभीकरण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पालखी महामार्गांच्या सुशोभीकरणासाठी सूचना पाठवा
पालखी महामार्गांच्या सुशोभीकरणासाठी सूचना पाठवा

नागपूर - संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या नावाने महाराष्ट्रात निर्माणाधीन असलेल्या दोन पालखी महामार्गांचा सर्वंकष विकास आणि सुशोभीकरण यासाठी सूचना पाठवण्याचे आवाहन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ‘या दोन महामार्गांचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेता त्यांचे सुसंगतरीत्या सुशोभीकरण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कामात लोकसहभाग अपेक्षित असून सर्व स्तरांतील सुजाण नागरिक, लोकप्रतिनिधी, वारकरी यांच्यामार्फत येणाऱ्या सूचनांच्या आधारे या कामात योग्य बाबींचा समावेश केला जाणार आहे, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

नागरिकांच्या सूचनाही लक्षात घेणार
‘वारी’ हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या चरणी सेवा अर्पण करणाऱ्या समस्त वारकऱ्यांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी दोन्ही पालखी मार्गांना महामार्गाचा दर्जा दिला असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. या महामार्गांसाठीच्या सूचना नागरिकांनी www.palkhimarg.com या संकेतस्थळावर नोंदवाव्यात. तज्ज्ञांच्या समितीमार्फत सूचनांची छाननी होऊन त्यातील चांगल्या, उल्लेखनीय सूचना नोंदवलेल्या व्यक्तींचा गौरव केला जाईल, तसेच त्यांची नावे संकेतस्थळावर प्रकाशित केली जातील, असेही सांगण्यात आले आहे. सदरील दोन्ही महामार्गांसाठी एकूण 11 हजार 680 कोटी रुपये खर्च केले जाणार असून, पूर्वापार चालत आलेली पालखी व वारी परंपरा यापुढील काळात अधिक सुकर व सोयीची होण्यासाठी या महामार्गांची मोठी मदत होईल, असा मला विश्वास वाटतो’, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.


संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग
पुण्यातील हडपसरपासून मोहोळपर्यंत संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग विकसित केला जात असून सुमारे 234 किमी लांबीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार असून सोयीसाठी दोन्हीं बाजूंना स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आले आहेत. हा महामार्ग सासवड-जेजुरी-निरा-लोणंद-फलटण-नातेपुते-माळशिरस-वाखरी-पंढरपूर या गावांच्या हद्दीतून जातो. सुरक्षिततेसाठी काही गावांना बाह्यवळण रस्ते प्रस्तावित केले आहेत. यासाठी अंदाजे 3 हजार 966 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, भूसंपादनासह अंदाजे एकूण 7 हजार 265 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.

संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग
पुणे जिल्ह्यातील पाटसपासून तोंडले-बोंडलेपर्यंत संत तुकाराम महाराज महामार्ग विकसित केला जात असून 136 किमीच्या या प्रकल्पातही रस्त्याचे चौपदरीकरण व दोन्ही बाजूंना स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आले आहेत. हा मार्ग बारामती-निमगाव केतकी-इंदापूर-अकलुज-वाखरी या गावांमधून जातो. सुरक्षिततेच्या दृष्टीने काही गावांना वळणरस्ते प्रस्तावित केले आहेत. या महामार्गासाठी अंदाजे बांधकाम खर्च 2 हजार 363 कोटी रुपये असून भूसंपादनासह एकूण खर्च 4 हजार 415 कोटी रुपये अपेक्षित असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -अगोदर मारली मीठी, नंतर पतीने दिला पत्नीला धावत्या लोकलमधून धक्का

Last Updated : Jan 14, 2021, 12:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details