नागपूर :नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज शनि्वार (दि. 14 जानेवारी)रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान एक फोन आला होता. दरम्यान, हा फोन एकदाच नाही तर तीनवेळा आला आहे. 11:32, 11:37 आणि 12:35 असा तीनवेळा हा कॉल आला आहे. त्या फोनवर समोरून बोलरा व्यक्ती दाऊद हस्तक असल्याचे बोलत होता. यामध्ये दाऊदच्या नावाचा वापर करत खंडणी मागत असल्याचेही यामध्ये समोर आले आहे. तसेच, या व्यक्तीने नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
काही सेकंदातच त्याने फोन कट केला : नितीन गडकरी यांचे खामल्यात जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात फोन आला. त्या फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे सांगून नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि काही सेकंदातच त्याने फोन कट केला. फोन घेणाऱ्याने लगचे भारतीय जनता पक्षातील वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. अर्ध्या तासातच गडकरी यांच्या संपर्क कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. तसेच, दहशतवाद विरोधी पथक आणि नक्षलवाद विरोधी अभियानाचे पथकासह अन्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
परिसरातही पोलीस बंदोबस्त वाढवला : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गडकरी यांचे वर्धा रोडवरील घर आणि खामल्यातील जनसंपर्क कार्यालयासमोर मोठा ताफा तैनात केला आहे. शस्त्रधारी पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली असून, घराकडे आणि जनसंपर्क कार्यालयाकडे जाणारे रस्ते तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे. नागपूर पोलिसांची बॉम्ब शोधक नाशक पथक आणि श्वानपथकहा सज्ज ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी परिसरातही बंदोबस्त वाढवला आहे.