नागपूर- राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. आता राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ही 39 वर पोहोचली आहे. त्यामुळे याचे गांभीर्य ओळखून नागपूरमध्ये कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आली आहे. जमावबंदीच्या आदेशानुसार आता 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एका जागी जमण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. सोबतच सार्वजनिक कार्यक्रमांवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन नागपूर पोलिसांनी केले आहे. 5 पेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र जमण्यावर पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा एक परिपत्रक काढून मंगळवारपासून जमावबंदी लागू केली आहे.
हेही वाचा -आठवलेंचा नवा नारा... म्हणून जागा झाला देश सारा
आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणूचा ( कोव्हीड -19 ) प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. नागपूर शहरात देखील कोरोना विषाणू बाधीत रूग्णांची नोंद झाली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाद्वारे कोरोना विषाणूचा प्रादुर्भव रोखण्याकरता साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू करुन त्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सांस्कृतिक भवने, शॉपिंग मॉल, जलतरण तलाव, व्यायामशाळा बंद करण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याच्या उद्देशाने नागपूर शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. या आदेशानुसार राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा आणि पूर्वी दिलेली परवानगी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असेही नागपूर पोलिसांनी सांगितले आहे.
नागपूरमध्ये जमावबंदी लागू हेही वाचा -'राष्ट्रवादी सोबतचं नातं तोडा, ..अन्यथा राज्यातही राजकीय भूकंप'