नागपूर- जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर, बहुतांश गावांमध्ये पूरस्थिती अद्याप कायम आहे. मात्र, अशा परिस्थितीत अनेक नागरिक गावांमध्येच अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी एसडीआरएफच्या पथकांनी बचाव कार्य सुरू केले आहे. पथकांनी जिल्ह्यातील ३६ गावांमधील तब्बल १४ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
जिल्ह्यात बरसलेल्या पावसामुळे पेंच, तोतलाडोहच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे, या धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. शिवाय दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील कन्हानसह प्रमुख नद्यांना देखील पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक गावातच अडकले होते. त्यानंतर एसडीआरएफच्या पथकांनी बचाव कार्याला सुरुवात केली. कालपासून सुरू असलेल्या या बचाव कार्यात आतापर्यत कामठी, कन्हान व इतर ३६ गावातील १४ हजार नागरिकांना पुरातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. शिवाय हे कार्य अजूनही सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे.