नागपूर - कुंभार, मूर्तिकार म्हणजे विघ्नहर्ता श्री गणेशाला हव्या त्या रूपात,हव्या त्या स्वरूपात घडवणारा अवलिया कलाकार. मातीच्या गोळ्याला विनायकाच्या रूपानं एकरूप करणारा कुंभार देवाला सर्वात जवळचा असावा, म्हणूच काय तर बाप्पाची मूर्ती घडवताना त्याच्यातील कलाकाराचा मातीला स्पर्श होताच ती माती अलगदपणे वरद विनायकाचे रूप धारण करते, पण या वर्षी विघ्नहर्त्याची विविध रूपं साकारणाऱ्या कुंभारांवरच यंदा कोरोना महामारीचे विघ्न आले आहे. एकीकडे राज्य सरकारने चार फुटांपेक्षा मोठी मूर्ती चालणार नाही असा फर्मान सोडला आहे तर दुसरीकडे सार्वजनिक गणेश उत्सव टाळता आला तर तो टाळावा असे आवाहन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केल्याने अनेक मंडळांनी माघार घेतली आहे, त्यामुळे मुर्तिकारांची अवस्था कात्रीत सापडलेल्या सारखी झाली आहे. केवळ मूर्ती व्यवसायावर पोट असणाऱ्या कुंभरांनी जगायचे कसे असा यक्ष प्रश्न उभा झाला आहे
विघ्नहर्त्याला घडवणाऱ्या कुंभारांवर कोरोनाचे विघ्न... चितारओळी....विदर्भातील कुंभरांची सर्वात मोठी वस्ती. या परिसरात सुमारे दोनशेपेक्षा जास्त कुंभारांची घरे आहे. या सर्वांचा व्यवसाय एकच तो म्हणजे मातीच्या मूर्ती
घडवणे. सुमारे ३०० वर्षांचा भोसलेकालीन इतिहास असलेल्या चितारओळीने आजवर अनेक चढउतार बघितले आहे, मात्र कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतुन मार्ग काढाण्याचा उपाय मात्र या मुर्तीकारांना गवसलेला नाही. किंबहुना शासन आणि प्रशासनाने तो मुर्तीकारांना गवसूच दिला नाही. म्हणूनच आज या कुंभारांवर उपासमारीची वेळ ओढवण्याची दाट शक्यता आहे.
चितारओळीत कुंभारांच्या प्रत्येक घरात बाप्पाच्या मूर्ती साकारल्या जातात. मात्र यावर्षी बाप्पाच्या आगमनाचा मुहूर्त अगदी जवळ आलेला असताना अजूनही बुकिंगच सुरू झालेल्या नाहीत. दरवर्षी सुमारे अडीच ते तीन हजार मोठ्या मूर्तींची बुकिंग येथे होत असते, तर सुमारे ५० हजार ते १ लाख घरगुती गणेश मूर्तींची निर्मिती केली जाते. मात्र यावर्षी कोरोनामुळे मुर्तिकारांचा व्यवसाय अर्ध्यावर येण्याची भीती मूर्तीकारांनी व्यक्त केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विनायकाच्या मूर्तीची उंची कमी केल्यानंतर आता नागपुर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव टाळता येईल तर तो टाळावा असे आवाहन केल्याने बहुतांश मंडळांनी सामाजिक जबाबदारी ओळखून यावर्षी माघार घेतली आहे. या कोरोनामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आल्याची जाणीव या कुंभरांना आहे. मात्र यामुळे वर्षभर कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने कुंभाराना मदत करण्यासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी त्यांनी केली आहे.