नागपूर- राज्यात जीम सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, शासन स्तरावर कोणताही निर्णय होत नसल्याने नागपूर शहराचे महापौर संदीप जोशी यांनी जीम सुरू करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. त्यांनी नुसातच पाठिंबा दिला नाही, तर ते उद्या स्वतः संविधान चौकात व्यायाम करून जीम सुरू करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील जीम सुरू करण्याची मागणी केली जात आहे. जीम असोसिएशन, बॉडी बिल्डर आणि असोसिएशनच्या सहप्रशिक्षकांनी महापौर संदीप जोशी यांची भेट घेऊन जीम सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबत राज्य सरकार अजूनही निर्णय घेत नसल्याने उद्या जीम समोर व्यायाम प्रेमी आणि जीम संचालकांसह प्रशिक्षक आंदोलन करणार आहेत. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहराचे महापौर संदीप जोशी स्वतः व्यायाम करून आंदोलनात सहभागी होणार आहेत.