नागपूर- महानगर पालिकेच्या ५३ व्या महापौरपदी मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना १०४ मते मिळाली. तर उपमहापौर पदी मनीषा कोठे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनाही १०४ मते मिळाली आहेत.
नागपूर महापौरपदी निवड झाल्यानंतर संदीप जोशींची विजयी रॅली भाजपच्या संदीप जोशी यांना १०४, आघाडीच्या हर्षला साबळे यांना २६ मते तर बसपाचे उमेदवार मोहम्मद इब्राहिम तौफीक यांना १० मते मिळाली. तसेच उपमहापौर पदासाठी भाजपच्या उमेदवार मानिषा कोठे यांना १०४, आघाडीचे दूनेश्वर पेठे यांना २६ मते तर बसपाच्या उमेदवार मंगला लांजेवार यांना १० मते मिळाली.
महापौरांची जागा यावेळी खुल्या प्रवर्गासाठी रिक्त असल्याने अनेकांमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र, सत्तापक्ष नेते म्हणून संदीप जोशींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संदीप जोशी सव्वा वर्ष आणि त्या नंतर दयाशंकर तिवारी सव्वा वर्ष महापौर पदाचा पदभार सांभाळतील.
या निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी तटस्थ भूमिका बजावली. शिवसेनेचे २ नगरसेवक महानगरपालिकेत आहेत. मात्र ते निवडणूक प्रक्रियेसाठी उपस्थित नव्हते. नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांची प्रशासनावर चांगली पकड आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.