नागपूर- भारतीय जनता पक्षाकडून नागपूर महानगरपालिका महापौरपदासाठी संदीप जोशी आणि दया शंकर तिवारी यांच्या नावाची घोषना करण्यात आली आहे. त्यानंतर लगेचच संदीप जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचबरोबर उपमहापौर पदाच्या निवडणुकीकरता भाजप नगरसेविका मनीषा कोठे यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. महापौर पदाचा कार्यकाळ दोन नेत्यांसाठी विभागण्यात आला असून पहिला मान हा संदीप जोशी तर दुसऱ्या टर्मसाठी दयाशंकर तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. कोण आहेत संदीप जोशी आणि दया शंकर तिवारी यावर एक नजर टाकूया.
नागपूर महानगरपालिकेचे नवे महापौर म्हणून संभावतः संदीप जोशी यांचा शपथ विधी होईल. संदीप जोशी हे भाजपचे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून लघू उद्योग विकास महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत. शिवाय, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जातात. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघात प्रचाराची जबाबदारी संदीप जोशी यांच्यावरच होती. तर दयाशंकर तिवारी हे देखील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असून माजी स्थायी समिती सभापती राहिले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत हिंदी भाषिकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून दयाशंकर तिवारी यांनी पश्चिम नागपूर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी दावेदारीही केली होती. परंतु पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली होती. पक्षामध्ये कुठलीही गटबाजी नसून सर्वच नेत्यांना संधी मिळावी म्हणून सव्वा-सव्वा वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.
हिंदी भाषिक मतदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न