नागपूर : शहरातील भाजपा पदाधिकारी सना खान यांची जबलपूर येथे आरोपी अमित साहूने हत्या केल्याची बाब स्पष्ट झाली आहे. सना खान या दोन ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. आता नागपूर शहर पोलिसांनी आरोपी अमित साहूला अटक करून नागपूरला आणले आहे. अमित साहूने सना खानची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
अमित आणि सना यांच्यात कडाक्याचे भांडण :अमित आणि सना यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. शेजाऱ्यांनाही भांडणाचा आवाज गेला होता. त्यानंतर मात्र थोड्या वेळात आवाज येणे बंद झाले. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र सना खान यांचा कुणाशीही संपर्क झाला नाही. त्याचदिवशी अमित साहू ढाबा बंद करून फरार झाला. सना खान यांचे अमितसोबत काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. अमित साहूचे यापूर्वीही जबलपूरमधील एका पोलीस कर्मचारी महिलेशी लग्न झाले होते. मात्र त्यांच्यात वाद असल्याने ती महिला अमितसोबत राहत नव्हती. त्यानंतर अमितने सना खान यांच्यासोबत लग्न केले, मात्र या दोघांमध्ये वाद झाला होता. पहिल्या पतीपासून सना खान यांनाही एक मुलगा आहे. आता खून केल्यानंतर तब्बल 10 दिवसानंतर अमित साहू पोलिसांच्या हाती लागला आहे.
अमित आणि सना खान होते बिझनेस पार्टनर :अमित आणि सना खान यांचे लग्न झाले होते. ते दोघे बिझनेस पार्टनर देखील होते. अमितच्या दमुआ येथे 'आशीर्वाद' नावाच्या ढाब्यात सनाने पैसे गुंतवले होते. तसेच सोन्याचे दागिने देखील अमितला तिने गिफ्ट केले होते. दागिने अमितने विकल्याचा संशय सनाला आला. त्यामुळे जबलपूरला पोहोचून पैशाचा व्यवहार आणि दागिन्यांविषयी विचारणा केल्यावर दोघांमध्ये मोठे भांडण झाले. या भांडणात रागाच्या भरात अमितने लोखंडी रॉड सनाच्या डोक्यावर मारून तिची हत्या केली.
सनाचा मृतदेह दिवसभर ठेवला घरात :सनाचा मृतदेह दिवसभर अमितने तसाच घरात ठेवला होता. दुपारनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास अमित त्याच्या घरी पोहोचला. त्याने सनाचा मृतदेह कारमध्ये ठेवून त्याच्या ढाब्याच्या मागे असलेल्या हिरण नदीत फेकून दिला. मृतदेह नदीत फेकल्यावर कार धुण्यासाठी ढाब्यावरील नोकराला दिली. त्यावेळी कारच्या डिक्कीत रक्त होते. कार स्वच्छ केल्यावर नोकर त्याच्या गावी निघून गेला आणि अमित तिथून कारसह फरार झाला. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. खुनामागे केवळ पैशाचा वाद आहे की आणखी काही कारण याचा, तपास पोलिसांना करायचा आहे, शिवाय सनाचा मृतदेह नदीतून शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
हेही वाचा -
- Sana Khana Muder : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या नेत्या सना खाना यांची हत्या
- BJP Sana Khan Missing : बेपत्ता भाजपा नेत्या सना खानसोबत घातपात? वाचा पोलीस काय म्हणाले...
- Sana Khan Murder : भाजप नेत्या सना खान यांची हत्या; एकाला अटक, जबलपूरमध्ये मृतदेहाचा शोध सुरू