नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक महिला नेत्या सना खान गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या संदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे नागपूर पोलिसांच्या हाती लागले आहेत. सना खान या जबलपूरच्या गोरा बाजार परिसरातील पप्पू उर्फ अमित साहू याच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या दोघांच्या लग्नाचे कागदपत्र पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोघेही बेपत्ता असल्याने सना खान यांच्यासोबत घातपात झाल्याची चर्चा नागपूरमध्ये सुरू झाली आहे. मात्र, नागपूर पोलिसांनी यासंदर्भातील वृत्त फेटाळून लावले आहे.
जबलपूरमध्ये शेवटचे लोकेशन : नागपूर शहरातील महिला भाजपाच्या नेत्या सना खान यांना शोधण्यासाठी मानकापूर पोलीस तपास करत असताना त्यांचे शेवटचे लोकेशन मध्यप्रदेशच्या जबलपूर शहरातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मानकापूर पोलिसांचे एक पथक जबलपूरमध्ये चार दिवस तळ ठोकून होते. जबलपूर येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची चर्चा नागपुरात सुरू झाली आहे, त्याची पुष्टी अद्याप नागपूर पोलिसांनी केलेली नाही. यासंदर्भात झोन दोनचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनीदेखील हे वृत्त सध्या निराधार आल्याचे स्पष्ट केले आहे.
पप्पू साहूची गुन्हेगारी पार्श्वभूमी : सना खान या नागपुरातून पप्पू उर्फ अमित साहूला भेटायला गेल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. मात्र पप्पू साहू हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी आहे. पप्पू जबलपूर येथे आशीर्वाद नावाचा ढाबा चालवतो. 2013 मध्ये पप्पूवर वाळू तस्करीच्या वादातून दोघांचा खून केल्याचा आरोप आहे. या खून प्रकरणात पप्पू सध्या जामीनावर बाहेर आहे. त्याच्यावर दारू तस्करीचेही आरोप आहेत. त्याचे एका महिलेसोबत लग्न झाल्याची चर्चा आहे. मात्र दोघात वाद झाल्याने घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या पप्पूचा आशीर्वाद ढाबा बंद आहे. पोलिसांनी त्याच्या शेजाऱ्यांना त्याच्याबाबत माहिती विचारली असता, 2 ऑगस्टला त्याच्या घरात वाद झाल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र कोणालाही त्याच्या घरी प्रवेश देण्यात आला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.