नागपूर - जिल्ह्यातील उमरेड येथील एकाच कुटुंबातील 8 सदस्य हे कोरोना बाधित झाल्याचे उघडकीस आले होते. त्यांना डेल्टा प्लस या नवीन व्हेरिएंटची लागण असल्याचा संशय आहे. यात नागपूर शहरातील आणखी चार संशयित रुग्णांचा समावेश झाला आहे. या संशयितांचे नमुने हे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील (मेयो) लॅबच्या मार्फत पाठवण्यात आले आहे. यामुळे 12 ही संशयितांचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), पुणे येथे पाठवण्यात आले आहे.
यामध्ये नव्याने मिळून आलेले कुटुंबातील चारही सदस्य कोल्हापूर येथून आले असल्याने केवळ खबरदारी म्हणून हे नमुने घेण्यात आले आहेत. या चारही रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरवर ठेवण्यात आले असून लक्षणे नसल्याचे सांगण्यात येत आहे. पण, कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांचे नमुने (स्वॅब) घेऊन ते पुणे एनआयव्हीला पाठवण्यात आले. हा अहवाल दोन तीन दिवसात येईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून दिली जात आहे.
उमरेड येथील संशयितांचेही नमुने पाठवण्यात आले एनआयव्हीला
मुंबईतून गावी परत आलेल्या एका तरुणीपासून तिच्या कुटुंबातील 7 सदस्यांना नवीन स्ट्रेनची लागण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यात कुटुंबातील 8 सदस्याने नमुने हे जिनोम सिक्वेसिंग करुन यामध्ये नवीन व्हेरिएंट आहे का, याबाबत याची चाचणी हैद्राबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अॅण्ड मॉलिक्यूलर बायोलॉजी लॅब तसेच नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) या दोन्ही संस्थेच्या वतीने केली जाणार होती. पण, प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उमरेड येथील 8 जणांचे नमुने व कोल्हापुरातून आलेल्यांचे घेण्यात आलेले चार नमुने हे एनआयव्ही, पुणे येथे पाठवण्यात आले आहे.