महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशातील सर्व नागरिकांची 'हिंदू' हीच ओळख - सरसंघचालक - RSS Dasara Melava LIVE Updates

RSS Dasara Melava LIVE Updates
LIVE : राष्ट्रीय स्वसंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यास सुरूवात

By

Published : Oct 25, 2020, 8:27 AM IST

Updated : Oct 25, 2020, 9:57 AM IST

09:43 October 25

स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा संपन्न..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आज नागपूरमध्ये पार पडला. हेडगेवार स्मृती सभागृहात केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरसंघचालक कोरोना, चीन आणि हिंदुत्त्व अशा विविध विषयांवर बोलले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे पहिले वर्ष सोडल्यास, पहिल्यांदाच एवढ्या कमी स्वयंसेवकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा पार पडत आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

09:24 October 25

नवीन शिक्षण योजना सर्वांना विश्वासात घेऊन आणली..

देशात लागू करण्यात आलेली नवी शिक्षण योजना ही संबंधित विभागातील सर्वांशी चर्चा करुन, सर्वांना विश्वासात घेऊन तयार करण्यात आली आहे, याचा नक्कीच भविष्यात फायदा होणार आहे.

09:23 October 25

शेतकरी जगाला पोसण्यासाठी शेती करतो, स्वतःच्या फायद्यासाठी नाही..

एक काळ असा होता जेव्हा लोक शेती उत्तम म्हणत. तेव्हाही देशातील शेतकरी स्वतःच्या फायद्यासाठी नाही, तर जगाला पोसण्यासाठी शेती करत होता.

09:19 October 25

शेतकरी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्याची गरज..

आपला देश कृषीप्रधान आहे. आपल्याकडे आठ हजारांहून अधिक तांदळाच्या प्रजाती होत्या, ज्यांपैकी कित्येक पाश्मिमात्त्य लोकांनी चोरुन नेल्या. जैविक शेती ही आपली परंपरा आहे. आपल्याकडील शेतकरी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ शकतो, जर त्याचा माल तो स्वतः विकू शकेल. त्याला बियाणे-खत यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही, पर्यायाने त्याला आत्महत्या करावी लागणार नाही. हीच स्वदेशी कृषी नीती आहे. आपण सध्या ती लागू करु शकत नसलो, तरी भविष्यात ती लागू करण्यात यावी यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे.

09:16 October 25

दारु बनवणे आपल्या संस्कृतीत बसत नाही..

आपल्याकडे जेवढ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत, ते पाहता आपण जगातील सर्वात मोठा दारु निर्यात करणारा देश बनू शकतो. मात्र, दारु बनवणे आपल्या संस्कृतीत बसत नाही.

09:12 October 25

स्वदेशीमधील 'स्व' हे हिंदुत्व..

कोरोनाच्या काळात आपण स्वदेशी शब्दाचा वारंवार प्रयोग केला. या स्वदेशी शब्दातील देशी म्हणजे नीती झाली. मात्र, त्यामधील 'स्व' हे खरंतर हिंदुत्वच आहे. तसेच, १८५७च्या उठावानंतर देशभरात जे विचारमंथन झाले, त्याचा गाभा आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत आहे, ज्याचाच अर्थ हिंदुत्व आहे, असे भागवत म्हणाले.

09:11 October 25

भारतमातेचे पुत्र हीच आपली सर्वांची ओळख..

आपण सर्व भारतमातेचे पुत्र आहोत. आपण सर्व प्रथम भारतीय आहोत. याला आम्ही हिंदू असणे म्हणतो, तुम्ही कदाचित दुसरं काही म्हणत असाल. मात्र, त्याने आपण सर्व भारतीय आहोत हे सत्य बदलत नाही. 

09:05 October 25

संघ केवळ हिंदू धर्मियांचा नाही..

संघ हा केवळ हिंदू धर्मासाठी काम करतो असा अपप्रचार काही लोक करतात. मात्र, आम्ही जेव्हा हिंदुराष्ट्र असा शब्दप्रयोग करतो, तेव्हा देशातील सर्व नागरिकांना तो हिंदू शब्द लागू होतो. देशात अनेक जाती-धर्मांचे लोक राहतात हे मान्य आहे. मात्र, आम्ही जेव्हा त्यांना हिंदू म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ भारतीय नागरिक असा असतो. आपण भारतातील लोक वेगवेगळे नाही. देशात विविधता आहे, याच विविधतेचा फायदा घेत 'टुकडे टुकडे गँग' सारखे लोक देशातील नागरिकांमध्ये फूट पाडते आहे. 

09:01 October 25

हिंदुत्व हे केवळ पूजेपुरते मर्यादित नाही..

हिंदू शब्द हा केवळ पूजेपुरता मर्यादित करत, संघावर टीका करणाऱ्यांनी याचा अर्थ संकुचित केला आहे. मात्र, भारत देशातील सर्व १३० कोटी नागरिकांना हिंदू हा शब्द लागू होतो, असे आम्हाला वाटते. 

08:57 October 25

चीनसोबतच अंतर्गत शत्रूंनाही तोंड देण्याची गरज..

सत्तेसाठी देशात निवडणुका होतात, त्यावेळी अनेक गट तयार होतात. हे साहजिक आहे. मात्र, निवडणुका या युद्धाप्रमाणे नाही तर स्पर्धेप्रमाणे असाव्यात. निवडणुकांदरम्यान अशा प्रकारे लढा होत असल्यामुळे देशातील नागरिकांमध्ये फूट पडताना दिसून येते. याचा फायदा खरंतर इतर राष्ट्रांना होतो. त्यामुळे सत्तेसाठी संघर्ष करताना सर्वांनीच विवेकाने वागायला हवे, असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

08:55 October 25

भारताच्या मित्रत्वाला देशाची कमजोरी समजू नका..

भारत शेजारील सर्व देशांशी मित्रता राखण्याचा प्रयत्न करतो. मात्र आपल्या या पवित्र्याला चीनसारखे देश आपली कमजोरी समजत असतील तर ते चुकीचे आहे हे आतापर्यंत त्यांनाही कळाले असेल. आपण श्रीलंका, ब्रह्मदेश सारख्या शेजारी राष्ट्रांशी असलेले आपले तंटे लवकरात लवकर सोडवून, चीनविरुद्ध एकत्र यायला हवे.

08:52 October 25

भारताने चीनला अनपेक्षित उत्तर दिले..

भारत-चीन सीमावादाबाबत भारताने यावेळी पहिल्यांदाच चीनला सडेतोड प्रत्युत्तर दिले, जे चीनला अपेक्षित नव्हते. मात्र, त्यामुळे आता आपल्याला अधिक सजग राहण्याची गरज आहे. चीनच्या तुलनेत आपण आपले लष्करी बळ अधिक वाढवणे गरजेचे आहे.

08:51 October 25

चीनचा खरा चेहरा सर्व जगासमोर आला..

कोरोना विषाणू चीनमधून आला आहे असे काही लोकांचे मत आहे, जे खरे असेल किंवा नसेल. मात्र, चीनचा विस्तारवादी चेहरा मात्र सर्व जगासमोर अधिक स्पष्टपणे आला. तैवान, भारत, अमेरिका, जपान, भूतान अशा अनेक देशांविरोधात चीनने एकत्रपणे कटुता घेतली आहे.

08:48 October 25

कोरोनामुळे जुनं ते सोनं हे सर्वांना पटलं..

कोरोनामुळे आपल्या संस्कृतीतील महत्त्वाच्या गोष्टी सर्व जगभरातील लोकांसमोर आल्या. घरात येताना पाय धुवून आत येणे, अशा प्रकारच्या आपल्या संस्कृतीतील चांगल्या सवयींचे महत्त्व सर्वांना पटले. तसेच, कोरोनामुळे जल आणि वायू प्रदुषणालाही मोठ्या प्रमाणात आळा बसला. परिस्थिती सामान्य झाल्यानंतरही लोक या सवयींचे आचरण कायम ठेवतील, की पुन्हा येरे माझ्या मागल्या करत चुकीच्या सवयी सुरू ठेवतील हे पाहूयाच, असेही सरसंघचालक म्हणाले.

08:44 October 25

कोरोनाचे संकट मोठे, मात्र लोकांची मदत त्याहून मोठी..

कोरोना महामारीच्या रुपात एक मोठे संकट आपल्यापुढे आले होते, मात्र त्यापुढे आपल्या लोकांनी इतरांना केलेली मदत ही आणखी मोठी ठरली. या संकटाने आपल्या आयुष्यातील कृत्रीम गोष्टींना बाहेरचा रस्ता दाखवला, आणि तसे करण्यात कोणतेही नुकसान नाही हेदेखील आपल्याला समजले. आपण ज्या गोष्टींशिवाय राहू शकत नाही असे आपल्याला वाटत होते, त्या गोष्टींशिवाय आपण राहू शकतो हे या महामारीने आपल्याला दाखवून दिले.

08:42 October 25

कोरोनाचा प्रसार भरपूर, मात्र धोका कमी

कोरोना विषाणूचा प्रसार हा वेगाने आणि मोठ्या प्रमाणात होत असला, तरी त्याचा धोका मात्र कमी आहे. कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही, मात्र त्यावर लस उपलब्ध नसल्यामुळे कोरोना होऊ नये यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. आता हळूहळू सर्वकाही पूर्वपदावर येत असताना कोरोनाशी संबंधित खबरदारी घेणे आवश्यक आहे.

08:40 October 25

शिक्षण व्यवस्था पूर्वपदावर आणणे मोठे आव्हान..

कोरोना नंतर आता जेव्हा सर्व काही हळूहळू सुरु होत आहे, तेव्हा शिक्षण व्यवस्थेकडूनही लोकांना अपेक्षा आहेत. मात्र, शिक्षकांना आतापर्यंतचे वेतन देणे, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तयार करणे, विद्यार्थ्यांची फी देणे अशी बरीच आव्हाने शिक्षण व्यवस्थेसमोर आहेत, असे सरसंघचालक म्हणाले.

08:39 October 25

कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली..

कोरोना काळात ज्याप्रकारे लोकांनी एकमेकांची मदत केली, स्वातंत्र्यानंतर अशा प्रकारचा सेवाभाव लोकांनी कदाचित पहिल्यांदाच अनुभवला. ज्या लोकांनी अशा प्रकारे इतरांची मदत केली, त्या सर्वांचे अभिनंदन; आणि या काळात 'शहीद' झालेल्या कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली.

08:35 October 25

कोरोना काळात लोकांनी स्वतः मदतीसाठी हात पुढे केला..

कोरोना महामारीला देशवासीयांनी साहसाने तोंड दिले. प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. ज्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, इतरांना मदत करण्याचे आवाहन करण्याआधीच लोकांनी इतरांची मदत करण्यास सुरुवात केली होती. कित्येक लोक स्वतः जेवण बनवून इतरांना वाटप करत होते. कित्येकांनी मोफत मास्क वाटले. अर्थात काही लोक अशा परिस्थितीचा गैरफायदाही घेत होते, मात्र एकूण मदत करणाऱ्यांची संख्या अधिक होती.

08:34 October 25

राममंदिराचा निर्णय देशवासियांनी संयमाने स्वीकारला..

राम मंदिराबाबत यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. दोन्ही बाजूंना न्याय्य असा हा निर्णय होता, आणि देशवासिसांनीही तो संयमाने स्वीकारला असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.

08:32 October 25

'सीएए'चा देशातील नागरिकांना धोका नाही

सीएए कायदा हा केवळ इतर देशातील पीडित नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात यावे, यासाठी आणण्यात येणार आहे. त्यामुळे याचा देशातील नागरिकांना कोणताही धोका नाही असे सरसंघचालक म्हणाले..

08:28 October 25

स्थापनेनंतर पहिल्यांदाच एवढ्या कमी स्वयंसेवकांच्या उपस्थितीत सोहळा..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे पहिले वर्ष सोडल्यास, पहिल्यांदाच एवढ्या कमी स्वयंसेवकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा पार पडत आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

07:55 October 25

राष्ट्रीय स्वसंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यास सुरूवात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यास सुरुवात झाली आहे. हेडगेवार स्मृती सभागृहात हा कार्यक्रम सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५० लोकांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Last Updated : Oct 25, 2020, 9:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details