नागपूर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या सोहळ्याकडे देशाचे लक्ष लागले आहे. शपथविधी सोहळ्यात देशातील अनेक राज्याचे मुख्यमंत्री आणि नेते उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले नाही.
महाविकास आघाडीच्या नेतृत्वात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याला देशभरातील मान्यवरांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह लालकृष्ण आडवाणी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याला राज्यातील शेतकरी ते वारकरी अशा सर्वांना आमंत्रित करण्यात आहे. मात्र, सरसंघचालक मोहन भागवत यांना निमंत्रित करण्यात आलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.