नागपूरSangharsh Yatra : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे उद्या नागपूर येथे येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या ८०० किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप होणार आहे. या सभेला पाहुणे म्हणुन मित्र पक्षाचे सर्वच नेतें उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये उध्दव ठाकरे, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिलीय.
या मागणीसाठी संघर्ष यात्रा: शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, धान, संत्रा, तूर आणि इतर शेतमालास योग्य भाव द्या, पिक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना देण्यात यावा, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, राज्यातील विविध खात्यातील रिक्त पदे त्वरीत भरा, महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा लागू करा, कंत्राटी नोकर भरती रद्द करा, ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला वाचवा, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, शाळा दत्तक योजना रद्द करा, समूह शाळा योजना रद्द करा, या आणि इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आमदार रोहीत पवार यांनी ही युवा संघर्ष यात्रा काढली आहे.